भाजपची दक्षिण गोवा उमेदवार निवड लांबली

0
21

>> आणखी दोन दिवस लागणार; भाजप प्रदेशाध्यक्षांची माहिती

उत्तर गोव्यातील लोकसभेचा उमेदवार जाहीर करून तीन आठवडे उलटत आले तरी अद्याप भाजपला दक्षिण गोव्यातील उमेदवार निवडता आलेला नाही. गेल्या शनिवारपासून भाजपच्या नेत्यांकडून आज, उद्या दक्षिणेतील उमेदवार जाहीर होईल असे सांगितले जात असून, कालचा दिवस उलटला तरी उमेदवार जाहीर झालेला नव्हता. दक्षिण गोव्यातील उमेदवारी पुरुष की महिला उमेदवाराला द्यावी, याबाबत भाजपमध्ये अजूनही संभ्रम आहे. त्यामुळे दक्षिणेतील उमेदवार निवड रखडली आहे. काल पत्रकारांशी संवाद साधताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी पुन्हा एकदा नवी तारीख जाहीर करत, येत्या दोन दिवसांत दक्षिण गोव्यातील उमेदवार जाहीर होईल, असे सांगितले.

भाजपच्या दक्षिण गोवा मतदारसंघातील उमेदवार निवडीचा सस्पेन्स कायम आहे. भाजपच्या दक्षिणेतील उमेदवाराच्या नावाची घोषणा बुधवारपर्यंत केली जाणार असल्याचे सदानंद शेट तानावडे यांनी मंगळवारी जाहीर केले हेोते. तथापि, काल दक्षिण गोवा मतदारसंघातील उमेदवाराच्या नावाची घोषणा झालीच नाही.

भाजपच्या दक्षिण गोवा मतदारसंघातील उमेदवाराच्या नावाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तानावडे यांनी बुधवारपर्यंत दक्षिण गोव्यातील उमेदवार जाहीर होईल असे सांगितले खरे; पण भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीकडून दक्षिण गोवा मतदारसंघातील उमेदवाराचे नाव निश्चित केलेले नाही. त्यामुळे उमेदवारी कोणाला मिळणार याबाबत इच्छुक उमेदवारांमध्ये धाकधूक वाढली आहे.
भाजपकडून दक्षिण गोवा मतदारसंघातील उमेदवारी पुरुष की महिलेला दिली जाते याची उत्सुकता लागलेली आहे. भाजपच्या प्रदेश समितीने संभाव्य पुरुष उमेदवारांची नावे नवी दिल्ली येथे पाठविली होती. त्यानंतर केंद्रीय निवडणूक समितीच्या सूचनेनुसार संभाव्य महिलांची नावे देखील पाठवली होती. त्यातून आता भाजपकडून कोणाला उमेदवारी जाहीर केली जाते, हे पाहणे औत्सुक्याचे
ठरणार आहे.

उमेदवार घोषणेसाठी नवी डेडलाईन
येत्या दोन दिवसांत दक्षिण गोवा मतदारसंघातील उमेदवाराच्या नावाची घोषणा केली जाईल, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी काल पत्रकारांशी बोलताना दिली.

आशिष सूद काय म्हणाले?
दक्षिण गोवा मतदारसंघासाठी पंतप्रधानांचा विकसित भारताचा संकल्प पुढे नेणारा उमेदवार भाजपकडून निवडला जाणार आहे, अशी माहिती भाजपचे गोवा प्रभारी आशिष सूद यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली. यावेळी त्यांनी काँग्रेसवर खोचक टीका केली. आपणाला मिळालेल्या माहितीनुसार गोव्यात काँग्रेस लोकसभा निवडणुकीत उमेदवार उभे करू शकणार नाही. कारण त्यांना उमेदवारच सापडत नाहीत, अशी टीका सूद यांनी केली.