भाजपच्या 46 व्या स्थापनादिनानिमित्त काल संपूर्ण गोवा भाजपमय झाला होता. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्यासह पक्षाचे सर्व मंत्री व आमदार यांच्याबरोबरच भाजपच्या हजारो कार्यकर्त्यांनीही काल आपल्या घरांवर पक्षाचा ध्वज फडकवल्यामुळे संपूर्ण गोवा भाजपमय झाल्याचे चित्र पहावयास मिळाले. आज (दि. 7) देखील स्थापनादिनानिमित्त कार्यक्रम होणार आहेत.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आपल्या निवासस्थानी सहकुटुंब पक्षाच्या ध्वजाचे रोहण केले, तर आरोग्यमंत्री विश्वजीत राणे व त्यांच्या आमदार पत्नी दिव्या राणे यांनी आपल्या निवासस्थानी भाजपच्या ध्वजाचे रोहण केले.
काल भाजप स्थापनादिनानिमित्त बोलताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले की, राष्ट्र प्रथम या आमच्या पक्षाच्या विचारधारेशी आम्ही बांधील आहोत. राष्ट्र प्रथम, द्वितीय स्थानी पक्ष व स्वत: अंतिमस्थानी हे भाजपची विचारधारा आहे.
आपल्या निवासस्थानी भाजपच्या ध्वजाचे रोहण केल्यानंतर केलेल्या ट्विटमधून मुख्यमंत्र्यांनी दशकभरापासून केलेली सेवा, समर्पण व राष्ट्रीय कर्तव्य हे काम यापुढेही चालूच राहणार असल्याचे म्हटले आहे. भाजप हा अंत्योदय तत्त्वावर काम करणारा पक्ष असून, सबका साथ, सबका विकास हे विकसित भारतासाठीचे आमचे ब्रीदवाक्य असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी काल रामनवमीनिमित्त भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्यासह भाटले येथील राम मंदिराला भेट देऊन श्रींचे दर्शन घेतले.
स्थापनादिनानिमित्त आपले मत व्यक्त करताना आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी आपण यापुढेही भाजपसाठी अथकपणे काम करणार असल्याचे स्पष्ट केले. शेकडो नि:स्वार्थी कार्यकर्त्यांमुळे भाजप हा एक मोठा व बलशाली असा पक्ष बनला असल्याचे स्पष्ट करतानाच पक्षाच्या अंत्योदय तत्त्वावर काम करण्याच्या पद्धतीमुळे आपण प्रभावित झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मंत्री गोविंद गावडे, नीळकंठ हळर्णकर, माविन गुदिन्हो, रवी नाईक, सुभाष शिरोडकर, सुभाष फळदेसाई, रोहन खंवटे, बाबूश मोन्सेरात, आलेक्स सिक्वेरा या मंत्र्यांबरोबरच पक्षाचे सर्व आमदार, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपल्या निवासस्थानी पक्षाच्या ध्वजाचे रोहण केले.
दि. 7 एप्रिल रोजी पक्ष स्थापनादिनानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून, त्याच दिवशी अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताद्बी वर्षानिमित्त अटल संमेलन होणार आहे.
दि. 8 व दि. 9 रोजी राज्यातील 3750 क्रियाशील कार्यकर्ते एकत्र येणार असून, भाजपने देशात घडवून आणलेल्या क्रांतीविषयीची माहिती देण्याचे काम करणार आहेत. 8 ते 12 या दरम्यान गाव चलो अभियान हाती घेण्यात येणार आहे, तर दि. 14 रोजी आंबेडकर जयंती साजरी करण्यात येणार आहे, तर 15 रोजी आंबेडकर यांच्या कार्याची माहिती देणारी चर्चासत्रे होणार आहेत.