मोर्चाप्रसंगी कॉंग्रेसचा आरोप
विवाहविषयक समान नागरी कायदा प्रभावहीन करण्याच्या कारस्थानासह भाजप सरकारच्या अनेक अपयशांवर जनतेचे लक्ष वेधण्यासाठी प्रदेश कॉंग्रेसने काल विधानसभेवर मोर्चा नेला. व सरकार विरुद्धच्या आरोपांचे एक निवेदन राज्यपालांना सादर करून त्याची प्रत सभापतीनाही पाठवून दिली. प्रदेश कॉंग्रेसचे उपाध्यक्ष तथा आदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स वगळता अन्य एकही आमदार या मोर्चात सहभागी झाला नाही.
भाजपाचा हिंदूत्वाचा गुप्त कार्यक्रम आता उघड होऊ लागल्याचा आरोप प्रदेश अध्यक्ष जॉन फर्नांडिस यांनी पत्रकार परिषदेत केला.
प्रादेशिक आराखडा, बेकायदेशीर खाण घोटाळा, प्रशासनातील भ्रष्टाचार निपटून काढणे, दुहेरी नागरिकत्वाचा प्रश्न, महागाई, भ्रष्टाचारी अधिकार्यांवर कारवाई, कचरा समस्या या सर्वच प्रश्नांवर पर्रीकर सरकार अपयशी ठरल्याचा आरोप फर्नांडिस यानी केला. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याच्या प्रयत्नाचा त्यांनी निषेध करून हिंदू राष्ट्र स्थापन करण्यासंबंधी मंत्री दीपक ढवळीकर यांनी केलेले विधान घटनाविरोधी असल्याने ते विधानसभेच्या कामकाजातून काढून टाकण्याची मागणीही फर्नांडिस यांनी केली. विशेष विवाह नोंदणी अधिकारी नियुक्त करण्याच्या निर्णयास कॉंग्रेसने विरोध केला आहे. आझाद मैदानावरून मोर्चा सुरू करण्यासही जिल्हाधिकार्यांनी मान्यता दिली नाही. सरकारच्या वाईट कृत्यांच्या विरोधात आवाज उठविण्याचा मूलभूत अधिकार चिरडून टाकण्याचा भाजप सरकार प्रयत्न करीत आहे. त्याचा हा प्रयत्न गोमंतकीय जनता खपवून घेणार नाही, असा इशारा फर्नांडिस यांनी दिला. या मोर्चात लॉरेन्स वगळता अन्य एकही आमदार का सामील झाला नाही, असा प्रश्न केला असता हा कॉंगे्रस पक्ष असल्याचे ते उत्तरले.