भाजपचा ‘समान नागरी कायदा’ ‘एक देश एक निवडणूक’वर भर

0
15

>> भाजपचा ‘संकल्प पत्र’ जाहीरनामा प्रसिद्ध

लोकसभा निवडणूक 2024 साठी भाजपने काल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा मुहूर्त साधून आपला ‘संकल्प पत्र’ जाहीरनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत प्रसिद्ध केला. भाजपने सदर जाहीरनाम्यात गरिब, युवा, शेतकरी आणि महिलांवर विशेष लक्ष दिले असून समान नागरी कायदा आणि एक राष्ट्र, एक निवडणूक घेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, भाजपने युवाशक्ती, नारीशक्ती, गरीब, शेतकरी या चार घटकांना केंद्रस्थानी ठेवून आपला जाहीरनामा तयार केला आहे. आम्ही सत्तेत आल्यास देशात मोठ्या प्रमाणात आर्थिक विकास केला जाईल, असे आश्वासन दिले आहे.
पंतप्रधान मोदी आणि भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या हस्ते भाजपने जाहीरनामा प्रसिद्ध केला. भाजप मुख्यालयात हा कार्यक्रम झाला. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंग, अर्थमत्री सीतारमण उपस्थित होते.

विरोधकांची भाजपवर जोरदार टीका

राहुल गांधी यांनी जाहीरनाम्यावर बोलताना भाजपने महागाई, बेरोजगारी या प्रश्नांना जाहीरनाम्यात स्थान दिलेले नाही. लोकांच्या दैनंदिन जीवनाशी जोडले गेलेल्या या प्रश्नांची भाजपाला चर्चा करायची नाही असे सांगून आमची योजना अतिशय स्पष्ट आहे. सरकार आल्यानंतर 30 लाख नोकरभरती करायची आणि प्रत्येक शिक्षित तरूणाला कायमची नोकरी प्रदान करायची आहे असे म्हटले आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा यांनी, भाजपचा जाहीरनामा एक ढोंग असून या जाहीरनाम्याला खरेतर संविधान बदलो पत्र म्हटले पाहिजे अशी टीका केली. जर त्यांना सत्ता मिळाली तर संविधान सुरक्षित राहणार नाही अशी टीका केली आहे.

वॉरंटीशिवाय गॅरंटी देणारे मोदी ः अमित पाटकर

भाजपच्या जाहीरनाम्यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी, भाजपचे मूळ कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांसह भारतातील जनतेला कळून चुकले आहे की, भारतात भाजप संपला आहे आणि आता केवळ मोदींच्या वॉरंटीविना असलेल्या गॅरंटी देऊन मतदारांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे म्हटले आहे.
भाजपने आज स्पष्ट केले आहे की त्यांच्याकडे नेतृत्वाची दुसरी फळी नाही. संपूर्ण संघटना मोदींनी हायजॅक केली आहे असा दावा पाटकर यांनी केला.

जाहीरनाम्यातील घोषणा

समान नागरी कायदा.
एक राष्ट्र एक निवडणूक.
रोजगार आणि उद्योजकतेभर भर
मोफत रेशन योजना पुढील पाच वर्षे.
आयुषमान भारत योजनेअंतर्गत पाच लाख रुपयांपर्यंत विमा आणि मोफत उपचार, 70 वर्षांवरील वृद्ध, तृतीयपंथीयांना योजनेचा लाभ.
गरीबांसाठी तीन कोटी घरे बांधणार.
पाईपमार्फत स्वस्त गॅस घराघरात.
वीजबिलाचा शून्य करण्याचा प्रयत्न.
गरीबांसाठी अनेक योजनांचा विस्तार.