गोवा भूमिपुत्र अधिकारिणी विधेयकावरून गोवा फॉरवर्ड पक्षाने येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रमोद सावंत सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी सरकारने हे विधेयक आणून लोकशाहीचा खून केल्याचा आरोप पक्षाचे नेते व माजी आमदार किरण कांदोळकर यांनी केला.
अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अन्य विधेयकांबरोबरच या विधेयकावरही सरकारने कोणतीही चर्चा अथवा दुरुस्त्या घडवून न आणता ते संमत केल्याचे कांदोळकर म्हणाले. गोवा फॉरवर्ड पक्षाचा या विधेयकाला पूर्ण विरोध असून पक्षाने या विधेयकासंबंधी राज्यपालांना एक निवेदनही सादर केले असल्याची माहिती कांदोळकर यांनी दिली. गोवा फॉरवर्डचे प्रमुख व आमदार विजय सरदेसाई यांनी विधानसभेत या विधेयकाला ठाम विरोध केला होता असे सांगून या विधेयकाला काहीही अर्थ नाही. मतांवर नजर ठेवून सावंत सरकारने वरील वादग्रस्त विधेयक विधानसभेत आणल्याचा आरोप कांदोळकरांनी केला.
कुळ-मुंडकार कायदाही निष्प्रभ
कुळ व मुंडकार यांना मालकी हक्क मिळवून देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या कायद्याचाही न्याय मिळवून देण्यासाठी फायदा झालेला नाही, असेही कांदोळकर म्हणाले. भूमिपुत्र विधेयकावर जोरदार टीका करताना या विधेयकाचा लोकांना कोणताही फायदा होणार नसल्याचा आरोप पक्षाचे सरचिटणीस मोहनदास लोलयेकर यांनी यावेळी केला. पत्रकार परिषदेला पक्षाचे उपाध्यक्ष दुर्गादास कामत हेही उपस्थित होते.
कोमुनिदाद जमिनीतील घरे
कायदेशीर कशी करणार?
कोमुनिदाद जमिनीत बेकायदा शेकडो घरे उभारण्यात आलेली आहेत. ही घरे सरकार कशी काय कायदेशीर करणार असा प्रश्न करुन कोमुनिदादची जमीन कुणीही विकत घेऊ शकत नाही. सरकारही ही कोमुनिदादची जमीन संपादित करू शकत नसल्याचे कांदोळकर यांनी सांगितले. बेकायदा घरे कायदेशीर करणारे विधेयक विधानसभेत बेकायदाच संमत केले होते. मात्र, विरोधकांनी त्यातील त्रुटी दाखवून दिल्यानंतर ते चिकित्सा समितीकडे पाठवून नंतर संमत करण्यात आले असल्याचे ते म्हणाले.