भाजप दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघात महिला उमेदवार देण्याचे केवळ नाटक करीत आहे. महिला मतदारांच्या मतांवर नजर ठेवून भाजप हे सगळे करीत आहे; मात्र ऐन वेळी दक्षिणेत महिला उमेदवार मिळू शकला नसल्याचे नाटक करून भाजप पुरुष उमेदवारालाच रिंगणात आणणार असल्याचा दावा काल गोवा महिला काँग्रेसच्या अध्यक्ष बीना नाईक यांनी पत्रकार परिषदेत केला.
भाजप दक्षिणेत महिला उमेदवार देऊ पाहत आहे. काँग्रेस पक्ष महिलेला उमेदवार कधी देईल, असा प्रश्न पत्रकारांनी केला असता त्यांनी वरील प्रतिक्रिया दिली.
भाजपला महिलांविषयी आदर अथवा प्रेम नसून, मतांसाठी केलेले हे एक नाटक आहे, असे नाईक पुढे म्हणाल्या. महिलांची मते मिळवण्यासाठीच भाजप राज्यातील महिलांना अयोध्येच्या तीर्थयात्रेवर नेत असल्याचा आरोपही नाईक यांनी केला.आतापर्यंत गोवा विधानसभेत काँग्रेस पक्षानेच जास्त महिलांना उमेदवारी देऊन आमदार म्हणून निवडून आणले असल्याचे त्या म्हणाल्या.