पणजी (प्रतिनिधी)
गोव्यात पूर्ण वेळ मुख्यमंत्री नेमण्याची आणि भाजप आघाडी सरकारकडून विधानसभेत बहुमत सिद्ध करून घेण्याची मागणी कॉंग्रेस पक्षाने नवी दिल्ली येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत काल केली. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या आजारपणामुळे राज्यातील निर्माण झालेल्या एकंदर परिस्थितीची माहिती देण्यासाठी कॉंग्रेस पक्षाने दिल्लीत खास पत्रकार परिषद घेतली. यावेळी कॉंग्रेसचे दिल्लीतील एक नेते पवन खेटा व गोवा कॉंग्रेसचे पदाधिकारी संकल्प आमोणकर होते.
गोव्यातील भाजपच्या नेतृत्वाखालील राज्याचा प्रशासकीय कारभार ढेपाळण्यास केंद्रातील भाजपचे नेते जबाबदार आहेत, असा आरोप गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी नवी दिल्ली येथे काल केला.
भाजपने बहुमत नसताना मागील दाराने प्रादेशिक पक्षांशी हातमिळवणी करून सरकार स्थापन करून गोमंतकीय जनतेची फसवणूक केली आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या आजारपणामुळे सरकारचा कारभार दिशाहीन बनला आहे, अशी टिका चोडणकर यांनी केली.
राज्यपालांना खास विधानसभा
अधिवेशन बोलवावे
राज्यपालांनी राज्य विधानसभेचे खास अधिवेशन बोलावून भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारला बहुमत सिद्ध करण्याची सूचना करावी. तसेच कॉंग्रेस पक्षाला बहुमत सिद्ध करण्याची संधी द्यावी. भाजपने गोव्यात लोकशाहीचा खून केला. आणि आता प्रशासकीय कारभार ठप्प करण्यासाठी प्रयत्न चालविला आहे, असेही चोडणकर यांनी सांगितले.
गंभीर आजारी मुख्यमंत्र्यांना
का वगळले नाही ?
मुख्यमंत्री पर्रीकर यांच्या मंत्रिमंडळातील दोघा मंत्र्यांना आजारपणाच्या कारणास्तव वगळण्यात आले आहे. परंतु गंभीर आजारी असलेल्या मुख्यमंत्र्यांना का वगळण्यात आलेले नाही ? असा प्रश्न चोडणकर यांनी उपस्थित केला.
कॉंग्रेस पक्षाने राज्यपालांना अनेक निवेदने सादर करून सरकारी पातळीवरील कामकाजात लक्ष घालण्याची विनंती केलेली आहे. याकडे चोडणकर यांनी लक्ष वेधले.