भाजपकडून उत्तर व दक्षिण गोवा जिल्हाध्यक्षांची निवड

0
2

>> उत्तरेतून दयानंद कारबोटकर, दक्षिणेतून प्रभाकर गावकर यांची वर्णी

सत्ताधारी भाजपने आपल्या मंडळ अध्यक्षांच्या निवडीनंतर काल शुक्रवारी आपल्या उत्तर व दक्षिण गोवा जिल्हा अध्यक्षांची निवड केली. उत्तर गोवा जिल्हा अध्यक्षपदी दयानंद कारबोटकर यांची, तर दक्षिण गोवा जिल्हा अध्यक्षपदी प्रभाकर गावकर यांची निवड केली आहे.

काल शुक्रवारी वरील दोघांचीही बिनविरोध निवड झाली. दोन्ही ठिकाणी प्रत्येकी एक-एक अर्ज आल्याने दोघांचीही बिनविरोध निवड झाल्याचे भाजपमधील सूत्रांनी स्पष्ट केले. दयानंद कारबोटकर व प्रभाकर गावकर हे पक्षाचे जुने कार्यकर्ते असून, त्या दोघांनी पक्षासाठी आतापर्यंत मोठे योगदान दिलेले असल्याचे भाजपमधील सूत्रांनी स्पष्ट केले. त्यांनी केलेल्या कामाची दखल घेऊन त्यांची जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
भाजपच्या संघटनात्मक निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण झालेली असून, आता गोवा भाजप प्रदेशाध्यक्षपद कोणाला मिळणार याची उत्कंठा सर्वांना लागली आहे. प्रदेशाध्यक्षपदासाठी दिलीप परुळेकर, बाबू कवळेकर, दयानंद मांद्रेकर, नरेंद्र सावईकर, दामू नाईक, दयानंद सोपटे व गोविंद पर्वतकर यांच्या नावावर चर्चा सुरू आहे.
दरम्यान, विद्यमान भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे हेही अध्यक्षपदाच्या स्पर्धेत असून, त्यांची पुन्हा एकदा अध्यक्षपदी निवड होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.