भाजपकडून ईडी, सीबीआयचा गैरवापर : युरी आलेमाव

0
3

>> दोन महिने चालणाऱ्या संविधान रक्षण अभियानाचा गोवा काँग्रेसकडून पणजीत शुभारंभ

राज्यातील नागरिकांना अनेक नागरिकांना आपल्या न्याय्य हक्कासाठी गेली कित्येक वर्षे आवाज उठवावा लागत आहे. भाजपकडून ईडी, सीबीआयसारख्या यंत्रणांचा गैरवापर करून विरोधी आमदारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. राज्यातील मंत्रिमहोदय भाजपच्या हातातील बाहुले बनले आहेत. या पार्श्वभूमीवर देशातील लोकशाही वाचविण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी पणजीत काल केले.

गोवा प्रदेश काँग्रेस समितीच्या 2 महिने चालणाऱ्या संविधान रक्षण अभियानाच्या शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते.
भाजपच्या एकाधिकारशाही कारभाराच्या विरोधात उघडपणे आवाज उठविण्याची गरज आहे. राज्यातील नागरिकांना आपल्या न्यायिक हक्कांसाठी झगडावे लागत आहे, तरीही त्यांना संवैधानिक अधिकार देण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. राज्यातील आदिवासी, ओबीसी बांधवांवर संवैधानिक अधिकारांबाबत अन्याय केला जात आहे, असेही आलेमाव यांनी सांगितले.

काँग्रेसच्या संविधान रक्षण अभियानातून राज्यभरात समानता, संस्कृती, पर्यावरण रक्षण, भेदभाव, भ्रष्टाचार, बेरोजगारी, आर्थिक न्याय असे प्रमुख मुद्दे जनतेसमोर मांडून जनजागृती केली जाणार आहे, असेही आलेमाव म्हणाले.
यावेळी गोवा काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी मार्गदर्शन केले. ज्येष्ठ वकील ॲड. क्लिओफात कुतिन्हो यांनी संविधानातील अधिकारांबाबत विवेचन केले. यावेळी आमदार आल्टन डिकॉस्टा, माजी खासदार फ्रान्सिस सार्दिन, एम. के. शेख, उत्तर गोवा अध्यक्ष वीरेंद्र शिरोडकर, दक्षिण गोवा अध्यक्ष सावियो डिसिल्वा व इतरांची उपस्थिती होती.