भाजप गावागावात केंद्र सरकारच्या ‘विकसित भारत’ ह्या योजनेचा प्रचार करून निवडणूक आचारसंहितेचा भंग करीत आहे, असा आरोप काल आमदार ॲड. कार्लुस फेरेरा यांनी पत्रकार परिषदेत केला. काँग्रेस या प्रकरणी निवडणूक आयोगाकडे व राज्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे दाद मागणार असून, गरज भासल्यास न्यायालयात धाव घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
भाजपने आपल्या कृतीद्वारे निवडणूक आचारसंहितेचा पूर्णपणे भंग केला आहे, असा आरोप फेरेरा यांनी यावेळी केला. भाजप पक्षाचे बावटे व स्कार्फ आदी परिधान करून हा पक्ष केंद्र सरकारच्या योजनेचा प्रचार करू शकत नसल्याचे व त्यासाठी सरकारी पैशांचा वापर करू शकत नसल्याचे फेरेरा यांनी स्पष्ट केले.
राजकीय फायद्यासाठी हे सगळे केले जात असून या गैरकृत्याला निवडणूक आयोगाने पायबंद घालायला हवा, अशी मागणी फेरेरा यांनी केली. आचारसंहितेचा अशा प्रकारे भंग केला जात असताना निवडणूक आयोग बघ्याची भूमिका कशी काय घेऊ शकतो, असा प्रश्न करून हे असेच चालू राहिले तर काँग्रेस पक्ष न्यायालयात धाव घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
एकदा निवडणूक आचारसंहिता लागू झाली की सरकार आपल्या योजनांचा प्रचार करू शकत नाही. तसे करणे हा निवडणूक आचारसंहितेचा भंग असल्याचे ॲड. कार्लुस फेरेरा म्हणाले.