भाकप व आयटकची आज गोव्यातही निदर्शने

0
97

भारतीय कम्युनिस्ट पार्टी व आयटकच्या गोवा शाखेने शेतकर्‍यांच्या मंगळवारच्या देशव्यापी बंदला पूर्ण पाठिंबा व्यक्त केला असल्याचे काल अनुक्रमे राजू मंगेशकर, ख्रिस्तोफर फोन्सेका यांनी पत्रकार परिषदेतून जाहीर केले. यावेळी बोलताना फोन्सेका यांनी केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी विधेयकांवर जोरदार टीका केली. या कृषी कायद्यांमुळे देशभरातील छोटे शेतकरी, ज्यांचे प्रमाण एकूण शेतकर्‍यांमध्ये ८० टक्के एवढे आहे ते मोठ्या कंपन्यांच्या हातचे बाहुले बनतील. स्वत:च्या शेतात काम करून पिक घेणारे हे शेतकरी वरील कायद्यांमुळे केवळ शेतमजूर बनून राहतील व मोठ्या कंपन्यांच्या पिळवणुकीला त्यांना सामोरे जावे लागेल, अशी भीती असल्याचे फोन्सेका यांनी सांगितले. खास करून देशात कांदे, बटाटे, टोमॅटो आदी पिके घेणारे शेतकरी देशोधडीला लागतील, असे ते म्हणाले.