मोपा विमानतळ उद्घाटनाचा दिवस जवळ येऊन ठेपतो आहे. गोव्याचे भूषण ठरणार असलेल्या या आंतरराष्ट्रीय विमानतळाला गोव्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. भाऊसाहेब बांदोडकरांचे नाव द्यावे अशी मागणी जनसामान्यांमधून पुढे येते आहे आणि ती सर्वथा योग्य आहे. एखाद्या राजकारण्याचे नाव राज्याचा मानबिंदू ठरणार असलेल्या अशा प्रकल्पाला देण्यात यावे, अशी मागणी जेव्हा आम जनतेमधून पुढे येते, तेव्हा खरोखरच त्या नेत्याचे तसे योगदान जनतेच्या ह्रदयामध्ये कोरले गेलेले असते. सरकारकडून एखाद्या राजकारण्याचे नाव देण्याचे प्रसंग नेहमीच येतात, परंतु तशा प्रकारची तोंडदेखली नामकरणे जनतेच्या ह्रदयाला स्पर्श करतातच असे नाही. याउलट जेव्हा जनता एखाद्या राजकीय नेत्याचे नाव पुढे करते, तेव्हा निश्चितच त्या लोकोत्तर नेत्याच्या जीवनकार्याप्रतीची कृतज्ञताच त्यामधून व्यक्त होत असते आणि अशा मागणीची दखल घेणे हे संवेदनशील सरकारचे कर्तव्य ठरते.
गोव्याचे पहिले मुख्यमंत्री एवढीच केवळ भाऊसाहेबांची ओळख नाही. खर्या अर्थाने ते गोव्याचे भाग्यविधाते आहेत. अज्ञान, लाचारी, गरीबीच्या कर्दमात खितपत पडलेल्या येथील बहुजनसमाजाच्या घरादारापर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचवून त्या निद्रिस्त समाजाला जागृत करण्यासाठी आणि मुक्त गोव्याच्या जडणघडणीत योगदान देण्यासाठी स्व. भाऊसाहेबांनी दिलेले योगदान नाकारणे हा कृतघ्नपणा ठरेल. त्यांच्याकडे पक्षीय नजरेतून पाहिले जाऊ नये. सध्या राज्यात भाजपचे सरकार असल्याने भाजपच्या एखाद्या बड्या नेत्याचे नाव ह्या विमानतळाला देण्याचे बेत सरकार आखू शकते, परंतु भाऊसाहेबांकडे म. गो. पक्षाचे नेते म्हणून पाहिले जाऊ नये. जातीपातीचा विचार तर होऊच नये. गोव्याचे दुसरे लोकनेते स्व. मनोहर पर्रीकर यांचे नाव नव्या जुवारी पुलाला आणि काणकोणच्या बगलमार्गाला देण्यात आलेले आहे. पणजीतील तिसर्या पुलाला अटलबिहारींचे नाव दिलेले आहे. म्हणजेच सरकारला वाटते तेव्हा आपल्या विचारधारेच्या नेत्यांची नावे देऊन ते मोकळे होते असाच याचा अर्थ होतो. फर्मागुढीच्या गोवा अभियांत्रिकी महाविद्यालय संकुलाला भाऊसाहेबांचे नाव आहे, परंतु तेथे तशी कमान उभारण्याचे आश्वासन देऊनही त्याची पूर्तता सरकारने न केल्याची खंत स्व. शशिकलाताईंनी आमच्यापाशी व्यक्त केली होती. विधानसभा संकुलात भाऊसाहेबांचा पूर्णाकृती पुतळा त्यांच्या महत्प्रयत्नांती उभारला गेला. मनोहर पर्रीकरांनीच त्याचे उद्घाटन केले होते व भाऊसाहेबांचा उल्लेख तेव्हा त्यांनी ‘द्रष्टे’ नेते असा केला होता. मग ह्या द्रष्ट्या लोकनेत्याचे नाव मोपासारख्या महत्त्वाच्या प्रकल्पाला देण्याचा द्रष्टेपणा सरकारपाशी का नसावा?
मोपाला भाऊसाहेबांचे नाव द्या अशी मागणी काही वर्षांपूर्वी दीपक ढवळीकर यांनी केली होती. आम्ही तेव्हाही त्या मागणीचे समर्थन केले होते. यापुढे कोणत्याही विमानतळाला व्यक्तींची वा नेत्यांची नावे द्यायची नाहीत असा धोरणात्मक निर्णय केंद्र सरकारने घेतला असल्याचे तेव्हा सरकारतर्फे सांगण्यात आले. ‘परदेशांतून येणारे प्रवासी आणि पर्यटक यांना ही व्यक्तींची नावे उच्चारता येत नाहीत’ असे कारण पुढे करून केंद्र सरकारने यापुढे नव्याने उभ्या राहणार्या विमानतळांना नेत्यांची नावे द्यायची नाहीत, असा तो निर्णय घेतल्याची सबब सांगितली गेली. मात्र, दुसरीकडे शहरे, रस्ते आणि रेल्वे स्थानकांची नावे मात्र धडाधड बदलली जात आहेत, त्यामुळे हा दांभिकपणा आहे. परदेशी पाहुण्यांच्या उच्चारांची काळजी वाहण्यापेक्षा आपल्या महान व्यक्तिमत्त्वांच्या स्मृती त्यांचे नाव देऊन चिरंतन करणे अधिक गरजेचे आहे. दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला इंदिरा गांधींचे, मुंबईच्या विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचे, कोलकत्याच्या विमानतळाला नेताजी सुभाषचंद्रांचे, अहमदाबादच्या विमानतळाला सरदार पटेलांचे, पाटण्याच्या विमानतळाला जयप्रकाश नारायणांचे, लखनौ विमानतळाला चौधरी चरणसिंगांचे, नागपूर विमानतळाला बाबासाहेब आंबेडकरांचे, पोर्ट ब्लेअरच्या विमानतळाला सावरकरांचे नाव दिलेले आहे आणि ही नावे यथोचित आहेत. बेंगलुरूच्या विमानतळाला त्या शहराचा संस्थापक केंपेनगौडाचे नाव आहे. उदयपूरच्या विमानतळाला महाराणा प्रतापांचे, इंदूर विमानतळाला अहिल्याबाई होळकरांचे, अमृतसर विमानतळाला शिखांचे गुरू रामदासजी यांचे, रांची विमानतळाला बिरसा मुंडाचे नाव आहे. मग भाऊसाहेबांचे नाव गोव्याच्या नव्या विमानतळाला देण्यात अडचण कोणती? अलीकडेच नवी मुंबईच्या प्रस्तावित विमानतळाला उद्धव ठाकरे सरकारने आपल्या शेवटच्या दिवशी दि. बा. पाटील यांचे नाव देऊन टाकले. मग ज्या पेडण्याशी भाऊंचे जन्माचे ऋणानुबंध जडलेले आहेत, तेथे साकारणार्या मोपासाठी भाऊसाहेबांच्या नावाचा विचार का होऊ नये?