भगवान शंकराचे वरदान मिळालेला भस्मासुर अखेर सगळेच भस्म करीत सुटला होता. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी वाढवलेला येवझिनी प्रिगोझिन नामक भस्मासुर अखेर आपल्याच नेत्यावर उलटला आणि मॉस्कोवर धडक द्यायला आपल्या रणगाडे आणि क्षेपणास्त्रांसह सुसज्ज अशा वॅग्नर सेनेसह निघाला. मॉस्कोपासून अवघ्या दोनशे किलोमीटरवर त्याची ही खासगी सेना पोहोचली असताना, बेलारुसच्या मध्यस्थीनंतर रक्तपात टाळण्याचे कारण देत त्याने तूर्त माघार जरी घेतली असली, तरी पुतीन यांची गेल्या 23 वर्षांची सत्ता आणि अधिकार यांना त्याने जबरदस्त हादरा दिला आहे. या प्रिगोझिनच्या खासगी सैन्याने आजवर रशियाच्या सगळ्या काळ्या कारवायांना आघाडीवर राहून साथ दिली. रशियाने क्रिमिया प्रांत आपल्या देशाला जोडला तेव्हा, किंवा डॉनबासमध्ये संघर्ष उफाळला तेव्हा, तुरुंगातून सोडलेल्या कट्टर गुन्हेगारांपासून बनलेली हीच वॅग्नर सेना रशियाच्या बाजूने आक्रमकपणे लढली होती. खरे तर रशियात कोणाला खासगी सैन्य बाळगायला परवानगी नाही. पण तुरुंगातील गुन्हेगारांना मोकळे सोडून, त्यांना लष्करी प्रशिक्षण देऊन ही सेना निर्माण करण्यास प्रिगोझिन याला पुतीन यांनीच तर प्रोत्साहन दिले होते. नाझींनी वॉर्सा शहरात घुसवलेल्या डर्लवेन्जर ब्रिगेडच्या धर्तीवर रशियाने या खासगी सैन्याचा आपल्या मोहिमांसाठी यथास्थित वापर केला. रशियाच्या आंतरराष्ट्रीय मोहिमांमध्ये – मग ती सिरियातील असो, सुडानमधील असो किंवा मालीतील असो, याच वॅग्नर सेनेने तेथे रशियाचे नाव पुढे येऊ न देता धुमाकूळ घातला होता. इतकेच कशाला, गेल्या वर्षी फेब्रुवारीत जेव्हा रशियाने युक्रेनमध्ये आपले भाडोत्री सैनिक घुसवले, तेव्हा याच वॅग्नर सेनेने आघाडीवर लढून रशियाला तेथे पाय रोवण्यात मोठी मदत केली होती. मात्र, वॅग्नर सेनेचा युक्रेन युद्धातील वाढता वरचष्मा रशियाच्या सैन्याधिकाऱ्यांना आणि संरक्षणमंत्र्यांना खुपत होता. रशियाच्या संरक्षणमंत्र्यांचे आणि सैन्यप्रमुखांचे निर्देश ऐकण्यास जेव्हा हे प्रिगोझिन आणि त्यांची सेना नकार देऊ लागली, तेव्हा त्यांच्यात वर्चस्वाचा संघर्ष उफाळला. त्यातच रशियाच्या सैन्याने वॅग्नरसेनेच्या तळावर हल्ला चढवून काही सैनिकांना ठार केले, तसे प्रिगोझिन चवताळले आणि त्यांनी थेट मॉस्कोकडेच मोर्चा वळवला.
आधी रशियाच्या पाच लष्करी जिल्ह्यांपैकी एकाचे मुख्यालय असलेल्या रुत्सोव ऑन डॉनमध्ये प्रवेश करून तेथील महत्त्वाच्या इमारतींवर ताबा मिळवला. संरक्षणमंत्री सर्जी शोइगू आणि लष्करप्रमुख वॅलरी गेरासिमोव यांच्यावर कारवाई करा ही त्यांची प्रमुख मागणी होती. परंतु पुतीन यांनी राष्ट्राला संबोधित करताना वॅग्नर सेनेचे हे पाऊल देशद्रोही ठरवले आणि कठोर प्रत्युत्तराचा इशारा दिला. त्याची परिणती भीषण रक्तपातात होईल याची जाणीव ठेवून प्रिगोझिन यांनी आता सशर्त माघार घेतली आहे. आपल्याविरुद्ध नोंदवलेला गुन्हा काढून घ्यावा, आपल्या सैनिकांविरुद्ध कारवाई करू नये या अटीही त्यांनी घातल्या आहेत. मध्यस्थी जरी बेलारूसने केलेली असली, तरी त्यांनी आधी पुतीन यांची त्यासाठी परवानगी घेतली होती. म्हणजेच पुतीन यांनीच ही मध्यस्थी घडवून आणली आहे. आता प्रिगोझिन यांना बेलारूसमध्ये आश्रयास जावे लागेल. मात्र, युक्रेनविरुद्धच्या सध्याच्या लढ्यावर या नव्या घडामोडीचा काय परिणाम होईल हे पहावे लागेल. प्रिगोझिन यांनी स्वतःच्याच देशाविरुद्ध बंड पुकारताच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी सुटकेचा निःश्वास सोडला होता. युक्रेनच्या आडून रशियाशी युद्ध लढणाऱ्या अमेरिकेनेही पुढील घडामोडींची अटकळ बांधून ब्रिटन, फ्रान्स आणि जर्मनी या आपल्या मित्रदेशांशी संपर्कही साधला होता. पुतीन यांची राजवट उलथवण्यात पाश्चात्त्य जग प्रिगोझिन यांच्या मदतीसाठी अप्रत्यक्ष रीतीने पुढे सरसावले असते. ही परिस्थिती ओळखूनच पुतीन यांनी हा अप्रत्यक्ष तहाचा मार्ग अवलंबिलेला दिसतो. युक्रेनचे अनेक भाग वॅग्नर सेनेनेच आपल्या ताब्यात घेतलेले आहेत. आता त्यांचे काय होणार, युक्रेनला ते परत मिळवता येणार का, रशियाच्या गेले सोळा महिने चाललेल्या युक्रेन मोहिमेवर वॅग्नर सेनेच्या बंडाचा किती परिणाम होणार हे पहावे लागेल. एकेकाळच्या आपल्या जवळच्या व्यक्तीच्या या बंडाने पुतीन यांच्या पायांखालची वाळू नक्कीच सरकलेली आहे. युक्रेनमधील लष्करी कारवाई लांबत चालली असल्याने रशियामध्ये विलक्षण अस्वस्थता आहे. त्यातून आपल्या सत्तेविरुद्ध कोणी उघड बंड पुकारत असेल तर त्याला वाढता पाठिंबा मिळू शकतो व आपली खुर्ची डगमगू शकते हे पुतीन यांना उमगले होते. त्यामुळे आता ते प्रिगोझिन यांच्यासंदर्भात पुढे कोणती भूमिका घेतात हे पाहावे लागेल.