राज्य सरकारच्या कृषी खात्याकडून सर्व प्रकारच्या भरडधान्य लागवडीला (मिलेट्स) प्रोत्साहन देण्यासाठी आगामी पाच वर्षांसाठी आर्थिक अनुदान योजना राबविण्यात येणार आहे. यासंबंधीची एक सूचना कृषी खात्याचे संचालक नेव्हील आफोन्सो यांनी सरकारी पत्रकात जारी केली आहे. वर्ष 2023-24 ते वर्ष 2027-28 या पाच वर्षासाठी ही योजना राबविण्यात येणार आहे. कृषी खात्याकडून सर्व प्रकारच्या भरडधान्य लागवडीला प्रोत्साहन दिले जाणार आहे. या योजनेचा राज्यातील सर्व शेतकरी, शेतकरी गट, समुदाय शेतकरी गट, सोसायट्या, शेतकरी क्लब लाभ घेऊ शकतात. या योजनेखाली शेतकऱ्याला हेक्टरी 20 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन मदत केली जाणार आहे. या योजनेखाली 500 चौरस मीटर ते जास्तीत जास्त 2 हेक्टरपर्यंतच्या लागवडीसाठी आर्थिक साहाय्य दिले जाणार आहे. शेतकऱ्याने भरडधान्य पिकाची लागवड केल्यानंतर तीन दिवसात आर्थिक साहाय्यासाठी विभागीय शेतकी अधिकाऱ्याकडे अर्ज सादर केला पाहिजे. कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर शेतकऱ्याला साहाय्य अनुदान दिले जाणार आहे.