मच्छीमारी ट्रॉलर मिरामारनजीक रुतला
इंजिन बंद पडल्यामुळे मंगळवारी मध्यरात्री समुद्रातून भरकटत मिरामार किनार्याजवळ आलेल्या एका मच्छीमारी ट्रॉलरवरील ३१ मच्छीमारांना किनार्यावरील जीवरक्षकांनी बुधवारी सकाळी सुरक्षित समुद्रातून बाहेर काढले. मच्छीमारीसाठी गेलेल्या या ट्रॉलरचे इंजिन अचानक बंद पडले व वादळी वार्यामुळे भरकटत तो मिरामार किनार्यानजीक रुतला. यावेळी या ट्रॉलरवर ३१ मच्छीमार होते. संकटात सापडलेल्या या मच्छीमारांनी मदतीसाठी आरडाओरडा केली असता बुधवारी सकाळी ७ च्या दरम्यान जीवरक्षकांनी समुद्रात धाव घेऊन या मच्छीमारांना वाचवले.
हा ट्रॉलर किनार्यापासून बराच दूर होता. त्यामुळे मच्छीमारांना पोहत किनारा गाठणे शक्य नव्हते. त्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जीवरक्षक त्यांच्या मदतीसाठी धावून गेले. या ट्रॉलरमध्ये भरपूर मासळी होती. तसेच ट्रॉलरमध्ये पाणीही भरले होते. त्यामुळे ट्रॉलर बुडण्याची स्थिती निर्माण झाली होती. यावेळी जीवरक्षक मदतीला धावल्याने ट्रॉलरवरील ३१ ही मच्छीमारांचे प्राण वाचू शकले. ट्रॉलर अजूनही समुद्रात असून दोरीच्या सहाय्याने तो ओढत किनार्यावर आणावा लागणार असल्याचे जीवरक्षकांनी एका स्थानिक वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.
सांतआंद्रेचे माजी आमदार फ्रान्सिस सिल्वेरा यांच्या भावाचा हा ट्रॉलर असल्याचे समजते.