भगवंत मान यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला

0
27

>> १६ मार्चला घेणार शपथ; अरविंद केजरीवाल राहणार उपस्थित

पंजाब विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला बहुमत मिळाले असून, त्यांचा सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यानंतर पक्षाने सत्तास्थापनेसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. आपचे विजयी उमेदवार भगवंत मान हे पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असून, त्यांच्या शपथविधीची तयारी आता सुरू झाली आहे. बुधवार दि. १६ मार्च रोजी भगवंत मान मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.

शपथविधीच्या कार्यक्रमाला भगवंत मान यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना निमंत्रण दिले आहे. १६ मार्च रोजी शपथविधीचा हा सोहळा पार पडेल. तत्पूर्वी आप पक्षाला भरभरून मते दिल्यामुळे पंजाबच्या जनतेचे आभार व्यक्त करण्यासाठी तसेच विजयोत्सव साजरा करण्यासाठी भगवंत मान हे दि. १३ मार्च रोजी अमृतसर येथे रोड शो करणार आहेत. या रोड शोमध्ये मान यांच्यासोबतच अरविंद केजरीवाल यांचीही उपस्थिती असणार आहे.
भगवंत मान हे शहीद भगतसिंग यांच्या खटकरकालन गावात मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. खटकरकालन हे शहीद भगतसिंग यांचे पंजाबमधील जन्मगाव आहे.

होळीच्या आधीच योगी घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ

उत्तर प्रदेशमध्ये सलग दुसर्‍यांदा स्पष्ट बहुमत मिळवणारे योगी आदित्यनाथ होळीच्या आधीच दुसर्‍यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची दाट शक्यता आहे. योगी आदित्यनाथ हे त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकार्‍यांसोबत होळीच्या आधी म्हणजेच १५ मार्च रोजी पदाची तसेच गोपनीयतेची शपथ घेऊ शकतात.