ब्ल्यू टॅक्सी स्टँडचा प्रश्न 1-2 आठवड्यांत मार्गी

0
5

>> वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांच्याकडून स्पष्ट

मोप येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील काळ्या-पिवळ्या टॅक्सी स्टँडऐवजी ब्ल्यू टॅक्सी स्टँड उपलब्ध करून दिला जाणार असून, ब्ल्यू टॅक्सी स्टँडचा प्रश्न येत्या एक ते दोन आठवड्यांत मार्गी लावण्यात येणार असल्याचे काल वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी स्पष्ट केले.
मनोहर विमानतळावर टॅक्सी स्टँड मिळावा, यासाठी पेडण्यातील टॅक्सी व्यावसायिक 1 मेपासून आंदोलन करत असून, काल सदर आंदोलकांची मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासोबत त्यांच्या आल्तिनो येथील शासकीय निवासस्थानी बैठक आयोजित केल्यानंतर गुदिन्हो यांनी ही माहिती दिली.

मनोहर विमानतळावरील ब्ल्यू टॅक्सीसाठींचे काऊंटर हे केवळ पेडणे येथील टॅक्सी व्यावसायिकांसाठीच असेल. मनोहर विमानतळावर ब्ल्यू टॅक्सी काऊंटर सुरू करण्यासाठी वाहतूक खात्याने जीएमआर कंपनीकडे परवानगी मागितली होती व ही परवानगी गेल्याच आठवड्यात मिळाली आहे. आता ब्ल्यू टॅक्सी सेवा सुरू करण्यााठी मोटर वाहन कायद्यात दुरुस्ती करावी लागणार असल्याचे गुदिन्हो यांनी सांगितले.