>> लंडनच्या बकिंगहॅम पॅलेसमध्ये दोघांची भेट; सरकार स्थापनेसाठी निमंत्रण
किंग चार्ल्स तृतीय यांनी ब्रिटनचे नवे पंतप्रधान म्हणून हुजूर पक्षाचे नवे नेते ऋषी सुनक यांची नियुक्ती केली आहे. ऋषी सुनक यांनी मंगळवारी लंडनमधील बकिंगहॅम पॅलेसमध्ये किंग चार्ल्स तृतीय यांची भेट घेतली. किंग चार्ल्स यांनी त्यांना देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून नियुक्त केले आणि त्यांना सरकार स्थापनेसाठी आमंत्रित केले. ऋषी सुनक हे भारतीय वंशाचे असून, ते गेल्या २१० वर्षांतील ब्रिटनचे सर्वात तरुण पंतप्रधान बनले आहेत. तसेच सुनक हे ब्रिटनचे गेल्या चार वर्षांतले पाचवे पंतप्रधान आहेत. शिवाय ते माजी अर्थमंत्रीही आहेत.
किंग चार्ल्स यांच्या भेटीनंतर ऋषी सुनक यांनी १० डाउनिंग स्ट्रीटवर आपले पहिले भाषण केले. चुका सुधारण्यासाठी माझी निवड करण्यात आली आहे. मी तुमची नम्रतेने सेवा करण्याचे वचन देतो. तसेच ब्रिटनच्या लोकांची सेवा करत राहीन. एकत्रितपणे आपण अविश्वसनीय गोष्टी साध्य करू शकतो. आपण सर्व मिळून चांगले भविष्य घडवू, असे सुनक यावेळी म्हणाले.
हे सरकार प्रामाणिकपणा, व्यावसायिकता आणि प्रत्येक स्तरावर जबाबदारीचे असेल. मी तुमचा विश्वास कमावला आहे आणि तो मी कायम राखीन. ब्रिटन हा महान देश आहे, पण देशासमोर गंभीर आर्थिक आव्हान आहेत, यात शंका नाही. पुढे कठीण निर्णय घ्यावे लागणार आहेत. सध्या आपला देश गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत आहे, असेही सुनक म्हणाले.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी मंगळवारी लिझ ट्रस यांनी किंग चार्ल्स तृतीय यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. त्यानंतर ऋषी सुनक व पेनी मॉर्डंट यांच्या पंतप्रधानपदासाठी शर्यत होती. हुजूर पक्षाच्या ३५७ खासदारांपैकी सुनक यांना १४२ जणांनी पाठिंबा दिला होता, तर पेनी मॉर्डंट यांच्याकडे केवळ २९ सदस्यांचे पाठबळ होते.
नेतेपदी निवड होण्यासाठी आवश्यक असलेला किमान १०० खासदारांचा पाठिंबा मिळणे अशक्यप्राय असल्याचे लक्षात येताच मॉर्डंट यांनी माघार घेतली होती. त्यानंतर ऋषी सुनक यांची सोमवारी हुजूर पक्षाच्या नेतेपदी बिनविरोध निवड झाली. अखेर काल त्यांनी किंग चार्ल्स तृतीय यांच्याकडून पंतप्रधानपदाचा पदभार स्वीकारला.
आपल्या देशाचे नेतृत्व करण्यासाठी तुमच्यासमोर उभा आहे. मी देशाच्या विकासासाठी राजकारणाच्या पलीकडे विचार करणार आहे. माझ्या पक्षाच्या विचाराप्रमाणे मी सरकार चालवण्याचा प्रयत्न करेन. आगामी काळात आपण सगळे सोबत आलो, तर खूप काही करू शकतो.
- ऋषी सुनक,
पंतप्रधान, ब्रिटन