ब्रिटिश सत्तेचा सुवर्णकाळ आणि अस्ताला जाणार्या साम्राज्याच्या साक्षीदार ब्रिटनच्या महाराणी क्वीन एलिझाबेथ द्वितीय (९६) यांचे काल वृद्धापकाळाने निधन झाले. ब्रिटीश राजघराणे तसेच ब्रिटन सरकारकडून त्यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे. त्यांच्या निधनाबद्दल ब्रिटनसह जगातील अनेक देशांनी शोक व्यक्त केला आहे. एलिझाबेथ यांच्या पश्चात चार अपत्ये, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. एलिझाबेथ यांच्या निधनानंतर आता प्रिन्स चार्ल्स हे ब्रिटनच्या गादीवर बसतील. ब्रिटिश राजघराण्याच्या सिंहासनावर एलिझाबेथ ह्या सात दशके विराजमान होत्या.
एलिझाबेथ यांचा जन्म लंडनमध्ये २१ एप्रिल १९२६ रोजी झाला. एलिझाबेथ यांचे शिक्षण घरातच झाले. वडील जॉर्ज यांचे १९५२ मध्ये निधन झाल्यानंतर एलिझाबेथ यांना १९५२ मध्ये ब्रिटनची महाराणी म्हणून घोषित करण्यात आले. त्यानंतर त्यांनी सलग सात दशके ब्रिटनची महाराणी म्हणून कामकाज पाहिले. एलिझाबेथ या जगात सर्वाधिक काळ सत्ता हाकणार्या महाराणी आहेत.
एलिझाबेथ यांचा विवाह प्रिन्स फिलीप यांच्यासोबत १९४७ मध्ये झाला. ९ एप्रिल २०२१ मध्ये वयाच्या ९९ व्या वर्षी त्यांचे निधन झाले होते. एलिझाबेथ यांनी कोरोनावर यशस्वी मात केली होती. मात्र वयोमानाप्रमाणे इतर आजारांचा सामना करावा लागत होता. एलिझाबेथ या फक्त ब्रिटनच्या महाराणी नव्हत्या तर आणखी १६ देशांच्या महाराणी होत्या.