- रमेश सावईकर
‘बोले तैसा चाले’ हा आवाज अंतःकरणातून येतो. त्याचा तो ‘आत्मस्वर’ असतो. ही अवस्था प्राप्त झाली की सुख, समाधान, शांती आपोआप त्याच्याकडे चालत येते. जीवनाचा आनंद उपभोगण्याची संधी मिळते. जीवन किती सुंदर आहे, हे जगणे किती सुंदर आहे याची सखोल जाणीव त्याला होते.
माणसाला पक्के ओळखणे आज कठीण बनले आहे. माणूस हा माणसासारखा वागतोच असे नाही. वरकरणी वाटणारा, भासणारा माणूस अंतःकरणी तसा असतोच असे नाही. आजच्या जमान्यात माणूस वेगवेगळे मुखवटे धारण करून आपण किती चांगला माणूस आहे हे दुसऱ्याला पटवून देण्याचा खटाटोप करीत असतो. त्यामागे दुसऱ्यांसाठी चांगली भावना, त्याग किंवा आपुलकी असते असे नाही. त्यांच्या ठायी दडून बसलेला असतो स्वार्थ, आपमतलबीपणा! पण काही माणसे मुखवटे धारण करण्यात एवढी तरबेज असतात की त्यांच्या बाह्य वागण्याला, चांगुलपणाच्या आवाला अनेकजण भुलतात. कारण दुसऱ्यांना भुरळ घालण्यात ते पटाईत झालेले असतात.
जो बाह्य रंगाला भुलला, तो अखेर फसलाच म्हणून समजा. संत चोखामेळाने तर सांगून ठेवले आहे- ‘भुलू नका बाह्य रंगा!’ हे अगदी खरे आहे. त्याचा प्रत्यानुभव येतोच.
रंग पाहुनिया वरचा गुंगलासी कां रे?
सावधान होई मनुजा काळ चालला रे!
वरकरणी दिसणाऱ्या रंगाला तू भुलू नकोस. त्यापासून सावध रहा. काळ पुढं जात राहणार, त्यानुसार बदल हे अपेक्षित आहेत. फसव्या जगात जगत असताना तुला ‘सावध’ राहूनच पुढचं पाऊल टाकायला हवं. तरच तुझा या जगात निभाव लागू शकेल, असा इशारा या काव्यपंक्तीतून दिला आहे.
लोकांना फसविण्यासाठी बोलायचे वेगळे, पण कृती मात्र त्याच्या विरुद्ध करायची, असं वागणारी माणसे जास्त असतात. वैयक्तिक जीवनापासून सार्वजनिक जीवनापर्यंत सर्वत्र अशाच प्रवृत्तीचा अनुभव येतो. सध्याच्या काळात अशा अनुभवाची प्रखरता एवढी वाढली आहे की क्षणाक्षणाला माणसाला त्यापासून ठेच लागते.
मराठीत एक म्हण आहे- ‘खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे असतात.’ तोंड उघडल्यावर ज्या दातांचे प्रदर्शन होते ते दात अन्न चावण्याचे काम करीत नाहीत. जे खायचे म्हणजे अन्न चावायचे काम करतात ते दात दिसत नाहीत. यावरून दुसरा वाक्प्रचार रूढ झाला असावा- ‘जसं दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं!’ जसं दिसतं तसं ते नसतं. जसं असतं तसं ते दिसत नाही म्हणून जग फसतं. परंतु फसवेपणाचा अवलंब करून माणसाने दुसऱ्याला कितीही फसविण्याचा प्रयत्न केला तरी अखेर त्याचे पितळ उघडे पडते. त्यावेळी ‘होत्याचे’ सारे काही ‘नव्हते’ होते!
काळ कोणताही असला तरी प्रामाणिकपणा हा त्रिकालाबाधित आहे. माणूस आधी स्वतःशी प्रामाणिक असला पाहिजे. माणूस जगाला फसवू शकतो पण स्वतःला कधीच फसवू शकत नाही. पण काही माणसे एवढी निर्ढावलेली असतात की लोकांना फसवणे यात काही त्यांना गैर वाटत नाही. ती चुकीचे बोलतात अन् चुकीचे वागतात, हे निर्लज्जपणे सांगतातही! तेही ‘बोले तैसा चाले’ असेच वागतात (पण दुसऱ्या अर्थी).
जग किती बदलले आहे याचा अनुभव माणसाला येतो. माणसांची बोलण्याची, वागण्याची तऱ्हा, रीत निराळी झाली आहे. मुखावर हास्य दिसते पण ते खरे नसते. ‘हॅलो’, ‘हाय’ म्हणून संबोधताना हृदयात काय भाव असतो हे कळणे कठीणच! माणसाच्या स्वार्थाला सीमा राहिलेली नाही. कितीही मिळाले तरी त्याला आणखी, असीम हवे असते. हव्यासाला सीमाच नसते. त्यागातच खरोखर जग जगते ही आपली युगायुगांची प्रतिमा नि संस्कृती आहे, याचा विसर पडलेला आहे. त्याग-संस्कृती कमी होऊन त्याची जागा भोग-संस्कृतीने घेतली आहे.
या पार्श्वभूमीवर म्हणावेसे वाटते की ‘बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले.’ संत तुकारामांचा हा प्रसिद्ध अभंग. जो त्याग करून दिलेल्या शब्दाचे पालन करतो, कर्णासारखे वचन पाळतो त्याची पाऊले लोक वंदतात. जो जसे बोलतो तसा वागतो, आपले कर्तव्य पूर्ण करतो, तो करीत असताना प्रसंगी मोठा त्याग करावा लागला तरी माघार घेत नाही, ती माणसे वंदनीय होतात. त्यांचे पुतळे उभारले जातात. त्यांचा आदर्श समाजापुढे ठेवला जातो. म्हणून शेकडो वर्षे उलटून गेली तरी संतांची अभंगवाणी मंदिरांतून भजनाच्या माध्यमातून कर्णपटलावर येते. संतांचे बोल हे आजचे जीवन कसे जगावे हे सांगणारे जीवनाच्या गणिताचे प्रमेय आहेत. ज्या संतांनी मद, मोह, माया, मत्सर, असूया, राग, लोभ, द्वेष या शत्रूंवर विजय मिळविला व आपला मार्ग पुढे आक्रमिला त्यांची पावले सर्व जगाने वंदिली, त्यांना नमस्कार केला.
संत तुकारामांनी आपल्या अभंगातून बोलण्याप्रमाणे जो आचरण करतो (वागतो) त्याचा मोठेपणा वर्णिला आहे. त्याला आपण वंदन करतो असे ते सांगतात.
बोले तैसा चाले। त्याचीं वंदीन पाऊलें॥
अंगें झाडीन अंगण। त्याचें दासत्व करीन॥
त्याचा होईन किंकर। उभा ठाकेन जोडोनि कर॥
तुका म्हणे देव। त्याचे चरणीं माझा भाव॥
- जो बोलतो त्याप्रमाणे वागतो त्याचे चरण मी वंदितो. त्याच्या अंगणीची जमीन मी स्वतः झाडून स्वच्छ करीन. त्याचे दासत्व पत्करीन आणि त्याचा सेवक बनून दोन्ही हात जोडून त्याला नमस्कार करीन. तोच माझा देव आहे आणि त्याच्या चरणकमलाची मी पूजा करीन.
बोलतो तसा वागतो अशी व्यक्ती मिळणे आज कठीण आहे. अशी व्यक्ती किती महान व पूजनीय आहे हे तुकारामांना माहीत आहे. त्याच्या गुणवत्तेचे महत्त्व ते कळकळीने सांगत आहेत. ते म्हणतात की असा माणूस स्वतः देवासारखा असतो.
संत तुकारामांच्या काळातही लबाडी, ढोंगीपणा भरपूर प्रमाणात होता. किंबहुना अशांचीच संख्या जास्त होती. ते लोक मोठमोठ्या बाता मारायचे. चराचरात ब्रह्म भरून आहे असे सांगायचे. माणसा-माणसांत भेद करायचे. स्त्रियांना तुच्छ मानायचे. खुद्द तुकारामांना त्यांनी कुणबी म्हणून हिणवले. त्यांच्या अभंगाच्या वह्या इंद्रायणी नदीत बुडविल्या. पण एवढे करूनदेखील तुकाराम डगमगले नाहीत.
जग माया आहे. कितीही कमावले तरी इथून जाताना काही घेऊन जायला मिळत नाही. इथेच सारे काही सोडून जावे लागते. जन्माला येताना मूठ वळलेली असते, पण जाताना (कायमचे) हात सताड पसरलेले असतात. जगभर माणसे आपली झोळी भरतच राहतात. ती कधीच भरत नाही. हांव कधीच पूर्ण होत नाही. पैसाअडका, जमीन-जुमला सर्व मिथ्या आहे. ही सर्व माया आहे, असे तुकाराम महाराज सांगतात.
संत तुकारामांना ज्यावेळी याचं भान आलं त्या क्षणी त्यांनी आपल्याकडे असलेली गहाणपत्रं नदीत सोडून दिली. सावकारकी बंद केली. तरी लोकांना मदत करणे बंद केले नाही. दुष्काळात सर्व धान्य लोकांना वाटून टाकले. त्याग करण्याचा आपला धर्म व तत्त्वनिष्ठा त्यांनी सोडून दिली नाही. अर्थात त्याची जबर किंमत त्यांना मोजावी लागली.
जग हे असेच असते. बोलण्याप्रमाणे वचनबद्ध होऊन वागणे, आचरण शुद्ध ठेवणे, त्यागासाठी कितीही किंमत मोजावी लागली तरी तत्त्वांशी ठाम राहून कर्तव्य निभावणे हे एक दिव्यच आहे. जगातील व देशातील थोर विभूतींनी हे ‘दिव्य’ करून दाखविले आहे. म्हणूनच त्या आज वंदनीय आहेत. त्यांना वंदन करण्यास हात नकळत जुळून येतात. कवी बा. भ. बोरकर म्हणतात त्याप्रमाणे- ‘दिव्यत्वाची जेथ प्रचिती, तेथे कर माझे जुळती।’ हे जगातले सत्य आहे याची प्रचिती येते.
महात्मा गांधीनी आपली वकिली सोडून समाजसेवेचा वसा स्वीकारला. ‘टॉलस्टॉय धाम’ काढून कुटुंबासह ते तिथे राहायला गेले. सत्य, अहिंसा, शांती या तत्त्वावर ते ठाम राहिले. तत्त्वनिष्ठा आणि त्याग प्राण द्यावे लागले तरी सोडणार नाही असा त्यांचा बाणा होता. ते मानवतेचे पुजारी होते. त्यांच्याप्रमाणेच संत गाडगे महाराज, ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले हे आपल्या तत्त्वप्रणालीशी ठाम होते. त्यासाठी कोणतीही जबर किंमत मोजावी लागली तरी त्यांनी त्याची पर्वा केली नाही. ज्योतिबा फुलेंनी अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी असिधाराव्रत स्वीकारले. समाजाकडून अवहेलना, तुच्छपणा, उपद्रव सहन करावे लागले तरी सावित्रीबाई फुलेंनी स्त्री-शिक्षणाची चळवळ पुढे नेऊन समाजाला नवीन दिशा दाखवून दिली. ‘वसुधैव कुटुंबकम्’ ही कल्पना या विभूती प्रत्यक्षात जगल्या. जसे बोलतात तसेच वागतात. कदापि माघार घेत नाहीत. तत्त्वनिष्ठा सोडत नाहीत. लोक काय म्हणतील याची पर्वा करीत नाहीत. भविष्यात काय परिणाम भोगावे लागतील याचा विचार करीत घेतलेला वसा टाकत नाहीत. अशी माणसे समाजात फार कमी असतात.
‘जे आहे ते आहे आणि जे नाही ते नाही’ असा दृष्टिकोन माणसाला प्राप्त होतो तेव्हा त्या अवस्थेला ‘वैराग्य अवस्था’ म्हणतात. ती अवस्था प्राप्त झालेला माणूसच क्षणाक्षणाचा आनंद घेऊ शकतो. असा माणूस कोणत्याही परिस्थितीत सुखीच असतो.
ही अवस्था प्राप्त झाल्यानंतर त्यांना इतरांच्या आयुष्याचे आयाम कळू लागतात. त्यांचे कंगोरे कुठे आहेत ते कळते. जीवनात कधी कसे चालायचे आणि कधी, कुठे, कसे थांबायचे हे कळू लागते. थांबल्यावर अरे पुढे गेलो असतो तर बरे झाले असते असे वाटणे आणि अरे थांबायला हवे होते असे वाटणे जवळजवळ बंद होते. कारण स्वतःच्या वागण्याकडे अलिप्तपणे, तटस्थ भूमिकेतून पाहण्याची दिव्यदृष्टी त्यांना प्राप्त झालेली असते.
‘बोले तैसा चाले’ हा आवाज अंतःकरणातून आला पाहिजे. म्हणजे त्या व्यक्तीचे अंतःकरण शुद्ध असले पाहिजे. वर्तणूक शुद्ध हवी. दृढ निश्चय हवा. कोणत्याही परिस्थितीत दिलेला शब्द किंवा वचन आणि स्वीकारलेले (आचरलेले) व्रत सोडता कामा नये, तरच लोक त्याला वंदन करतील. त्याला देवपण प्राप्त होईल. संत तुकारामांना आपल्या अभंगातून हेच सांगायचे आहे.
आपण जे करतो ते अलिप्तपणे पाहायचे. आपण कसे आहोत हे कळण्यासाठी स्वतःकडे लक्ष असणे आवश्यक असते. कसे वागावे, हे कोणी कोणालाच सांगू शकत नाही. कुणी सांगूही नये आणि कुणी ऐकूही नये. आपल्या वागणुकीकडे स्वतःचे सतत लक्ष असायला हवे. आपोआप ऊर्जा वाढत जाते. चुकीचे वागलो की ऊर्जा कमी होते हे आपल्याला कळू लागते. कारण ‘बोले तैसा चाले’ हा आवाज अंतःकरणातून येतो. त्याचा तो ‘आत्मस्वर’ असतो. ही अवस्था प्राप्त झाली की सुख, समाधान, शांती आपोआप त्याच्याकडे चालत येते. जीवनाचा आनंद उपभोगण्याची संधी मिळते. जीवन किती सुंदर आहे, हे जगणे किती सुंदर आहे याची सखोल जाणीव त्याला होते. या जगण्यावर, या जीवनावर प्रेम केलेच पाहिजे, करीत राहिले पाहिजे… जीवनाच्या अंतापर्यंत! हे त्याला उमगते आणि त्याच्या ओठांवरती शब्द येतात-
या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे।
जीवन म्हणजे खरे काय हे आपल्याला कळले, सत्य गवसले की त्यातून निर्माण झालेल्या असीम आनंदाच्या अनंत स्मितरेषा त्याच्या चेहऱ्यावर उमटतात… त्या स्मितरेषांतून जीवनाचा बोध इतरांना देताना आगळं-वेगळं समाधान त्यांना लाभतं!