बोरीत साकारणार कवी बोरकरांचे भव्य स्मारक

0
10

>> आज पणजीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार स्मारक फलकाचे अनावरण

कविवर्य बा. भ. बोरकर यांचे जवळजवळ सहा कोटी रुपये खर्चून एक भव्य असे स्मारक त्यांच्या गावी म्हणजे फोंडा तालुक्यातील बोरी येथे उभारण्याचा संकल्प बाकीबाब यांच्या कन्या श्रीमती मुक्ता आगशीकर यांनी सोडला असून बोरकर स्मारक प्रतिष्ठानच्या माध्यमातून कोमुनिदादच्या दहा हजार चौरस मीटर जागेमध्ये हे स्मारक उभे राहणार आहे. कविवर्य बोरकर यांच्या 8 जुलै ह्या पुण्यतिथीच्या निमित्ताने या नियोजित स्मारकाच्या फलकाचा अनावरण सोहळा पणजीत आज सकाळी 9.30 वाजता आयोजित करण्यात आला आहे.

इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा संस्था, कविवर्य बोरकर स्मारक प्रतिष्ठान यांच्यातर्फे आयोजित केलेल्या या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे व गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत या स्मारक फलकाचे अनावरण करतील. यावेळी सन्माननीय पाहुणे म्हणून गोव्याचे जलसंसाधनमंत्री श्री. सुभाष शिरोडकर, विशेष अतिथी म्हणून कला व संस्कृती मंत्री श्री. गोविंद गावडे, तसेच विशेष अतिथी म्हणून डॉ. भरत बळवल्ली यांची उपस्थिती असेल. या निमित्ताने आयएमबीतर्फे ‘तेथे कर माझे जुळती’ या कार्यक्रमाचे आयोजन केले असून त्यात राजेश मडगावकर, बिंदिया वस्त नाईक, विष्णू शिरोडकर, रोहित बांदोडकर व मानसी वाळवे यांचा सहभाग असेल. सकाळी 11 वाजता ‘जीवन त्यांना कळले हो’ हा कार्यक्रम डॉ. घनश्याम बोरकर व सौ. तेजश्री दीक्षित सादर करतील.