गोव्याने नागालँडचा २२९ धावांसह पराभव करीत प्लेट गट रणजी सामन्यात काल बोनस गुणासह आकर्षक विजय मिळविला. गोव्याचा हा यंदाच्या स्पर्धेतील सहावा विजय ठरला. सोविमा येथील नागालँड क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळविण्यात आला.
पहिल्या डावात नागालँडला १७६ धावांवर गारद करीत गोव्याने १४२ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. प्रत्युत्तरात गोव्याने आपला दुसरा डाव ४ बाद २२१ धावांवर घोषित करीत नागालँडसमोर ३६४ धावांचे विजयी लक्ष्य ठेवले. गोव्याचा कर्णधार अमित वर्माने ६ चौकार व २ षट्कारांनिशी ७३ चेंडूंत ६६ धावांची तर स्नेहल कवठणकरने ९ चौकार व १ षट्कारानिशी ६३ चेंडूंत नाबाद ६८ धावांची अर्धशतकी खेळी केली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी महत्त्वपूर्ण १०३ धावा जोडल्या. नागालँडकडून स्टुअर्ट बिन्नीने २ गडी बाद केले.
प्रत्युत्तरात ३६४ धावांचे विजयी लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या नागालँडचा दुसरा डावही गोव्याच्या गोलंदाजांनी १३४ धावांत उखडला. नागालँडकडून स्टुअर्ट बिन्नीने एकतर्फी झुंज देताना ८ चौकार व ३ षट्कारांसह ६४ चेंडूंत ५८ धावां जोडल्या. गोव्याला बोनस गुणांसह विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलताना विजेश प्रभुदेसाईने ३ तर दर्शन मिसाळ, लक्षय गर्ग आणि अमित वर्मा यांनी प्रत्येकी २ बळी मिळविले.
विजयामुळे गोव्याने एकूण ७ गुणांची कमाई केली असून ८ सामन्यांतून त्यांची एकूण गुणसंख्या ४३ धावांवर पोहोचली आहे. त्यांच्या पाठोपाठ पुद्दुचेरी ४१ तर चंदिगड ३६ गुणांसह अनुक्रमे द्वितीय व तृतीय स्थानी आहे. गोवा आपला शेवटचा लीग सामना १२ ते १५ फेब्रुवारीपर्यंत मिझोरमविरुद्ध खेळणार आहे.
संक्षिप्त धावफलक ः गोवा, पहिला डाव ः ३१८ धावा. नागालँड, पहिला डाव ः सर्वबाद १७६ धावा. गोवा, दुसरा डाव ः ४ बाद २२१ घोषित, (सुमिरन आमोणकर ४२, अमित वर्मा ६६, स्नेहल कवठणकर नाबाद ६८, दर्शन मिसाळ नाबाद १९ धावा. स्टुअर्ट बिन्नी २-२९ बळी), नागालँड, दुसरा डाव ः ३६.४ षट्कांत सर्वबाद १३४, (श्रीकांत मुंढे ३५, स्टुअर्ट बिन्नी ५८ धावा. विजेश प्रभुदेसाई ३ -१३, लक्षय गर्ग २-१५, दर्शन मिसाळ २-३१, अमित वर्मा २-८, फेलिक्स आलेमाव १-३१ बळी).