>> कळंगुट पोलीस व बंदर कप्तान खात्याची कारवाई; व्हायरल व्हिडिओमुळे बोटमालकाचा खोटेपणा उघड
नाताळदिनी कळंगुट येथे समुद्रात जलसफरीवेळी बुडालेल्या बोटीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त पर्यटक भरल्याचे काल उघड आले. बोटीतील पर्यटकांची क्षमता 10 एवढीच असताना त्यात जवळपास 18-20 पर्यटक भरल्याचे व्हायरल व्हिडिओतून समोर आले. या बोट दुर्घटनेप्रकरणी बोट ऑपरेटर व हेल्पर अशा दोघा जणांना कळंगुट पोलिसांनी काल अटक केली. धोरप्पा झिलारी (42, रा. बेळगाव) आणि इब्राहिमसाब (34, रा. शिमोगा) अशी अटकेतील दोघांची नावे आहेत. याशिवाय बंदर कप्तान खात्याने बोटमालकाचा जलसफरीसाठीचा परवाना तात्काळ प्रभावाने निलंबित केला आहे.
नाताळच्या सुट्टीनिमित्त खेड-रत्नागिरीतील पोफळकर कुटुंबीय गोव्यात आले होते. बुधवारी सकाळी पर्यटकांना सोबत घेऊन एक बोट जलसफरीसाठी समुद्रात उतरली. त्यावेळी बोटीला अपघात झाल्याने जवळपास 20 जण पाण्यात पडले. त्यात सूर्यकांत पोफळकर (45, रा. खेड) यांचा बुडून मृत्यू झाला होता. या दुर्घटनेतून बचावलेल्या पाच जणांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. बुधवारच्या दुर्घटनेनंतर बोट व्यावसायिकांनी गुरुवारी जलसफारी बंद ठेवल्या.
कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी काल कळंगुट किनाऱ्याला भेट देऊन पाहणी केली. जलसफरीसाठी येणाऱ्या प्रवाशांची सुरक्षा महत्त्वाची आहे. निष्काळजीपणा करणाऱ्या बोटमालक, ऑपरेटरवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
नियम उल्लंघनामुळे परवाना निलंबित
मीना कुतिन्हो (रा. उमतावाडो-कळंगुट) यांना जलसफरीसाठी दिलेला परवाना राज्य सरकारच्या बंदर कप्तान खात्याने तात्काळ निलंबित केला आहे. काल याबाबत आदेश जारी करण्यात आला. नियमांचे उल्लंघन क्षमतेपेक्षा अधिक पर्यटकांना बोटीत बसवल्याने ही कारवाई करण्यात आली.
दुर्घटनेवेळी बोटीत होते 18 ते 20 पर्यटक
मीना कुतिन्हो यांच्या जलसफरी बोटीला कळंगुट समुद्रात 25 डिसेंबरला झालेल्या अपघातात एक पर्यटकाचा बुडून मृत्यू झाला होता. तसेच अनेक जण पर्यटक जखमी झाले होते. तक्रारदाराच्या एकाच कुटुंबातील 12 सदस्यांबरोबर इतर मिळून 18 ते 20 पर्यटक दुर्घटना घडली, त्यावेळी बोटीत होते, असे बंदर कप्तान खात्याने म्हटले आहे.
व्हिडिओमुळे बोटमालकाचा दावा ठरला खोटा
जलसफरी करणाऱ्या त्या दुर्घटनाग्रस्त बोटीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर काल व्हायरल झाला. त्या व्हिडिओत या बोटीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्याचे दिसून येत आहे. तसेच, लहान मुलांना जलसफरीला मनाई असताना त्यांना सुध्दा प्रवेश देण्यात आल्याचे दिसून येत आहे. एवढेच नव्हे, तर त्या लहान मुलांना लाईफ जॅकेट सुद्धा दिले नव्हते. बोटमालकाने दुर्घटनाग्रस्त बोटीत 12 व्यक्ती असल्याचा दावा केला होता. तथापि, या बोटीतील प्रवाशांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे बोटमालकाचा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
बोटीची क्षमता किती?
या बोटीची क्षमता 10 पर्यटक आणि 2 कर्मचारी एवढी आहे. बोटीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसविण्यात आल्याने बोटी दुर्घटनाग्रस्त झाली. या पार्श्वभूमीवर बोटीला जलसफरीसाठी देण्यात आलेला ना हरकत दाखला तात्काळ निलंबित करण्यात येत आहे, असेही बंदर कप्तान खात्याने जारी केलेल्या नोटिसीमध्ये म्हटले आहे.