>> कोलवाळ येथून 33 जण अटकेत; ॲमेझॉनचे कर्मचारी असल्याचे भासवत भामट्यांकडून अमेरिकन नागरिकांची फसवणूक
गोवा पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण विभागाने अमेरिकन नागरिकांची फसवणूक करणाऱ्या कोलवाळ येथील बोगस ॲमेझॉन कॉल सेंटरवर छापा टाकून 33 जणांना काल अटक केली. त्यांच्याकडून 26 संगणक व इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू देखील जप्त केल्या. या बोगस कॉल सेंटरमधील कर्मचारी अमेरिकन नागरिकांना फोन कॉल करून आपण ॲमेझॉनचे कर्मचारी असल्याचे भासवत होते. या प्रकरणी अटक करण्यात आलेले सर्व संशयित आरोपी परराज्यातील रहिवासी आहेत, अशी माहिती गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस अधीक्षक निधीन वाल्सन यांनी काल दिली.
गोवा पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण विभागाने 11 एप्रिलला पहाटेच्या वेळी ही कारवाई केली. मध्यरात्री 12 ते सकाळी 6 या वेळेत हे बोगस कॉल सेंटर चालविण्यात येत होते. या बोगस कॉल सेंटर प्रकरणातील मुख्य संशयित जिगर परमार (35 वर्षे) हा अहमदाबाद-गुजरात येथील रहिवासी असून, इतर संशयित महाराष्ट्र व इतर राज्यांतील रहिवासी आहेत. या प्रकरणी अटक केलेल्यांमध्ये 24 पुरुष आणि 8 महिलांचा समावेश आहे, असेही निधीन वाल्सन यांनी सांगितले.
या प्रकरणी तपास प्राथमिक टप्प्यात आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी सायबर गुन्हे विभागाची गरज भासल्यास मदत घेतली जाणार आहे. पोलीस निरीक्षक नारायण चिमुलकर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली, अशी माहिती निधीन वाल्सन यांनी दिली. संशयितांविरुद्ध गुन्हा अन्वेषण पोलिसांनी फसवणूक, कटकारस्थान व माहिती-तंत्रज्ञान कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे.
तारक आरोलकर यांची चौकशी होणार
बोगस कॉल सेंटर चालविण्यात येणारी जागा म्हापसा येथील तारक आरोलकर यांच्या मालकीची आहे. या प्रकरणी तारक आरोलकर यांचीही चौकशी केली जाणार आहे, असेही पोलीस अधीक्षक निधीन वाल्सन यांनी सांगितले.
बोगस कॉल सेंटरशी आपला
संबंध नाही : आरोलकर
कोलवाळ येथील बोगस कॉल सेंटर प्रकरणाशी आपला काहीही संबंध नाही. आपण ही जागा कंपनीला सर्व कायदेशीर सोपस्कार करून गेल्या ऑगस्ट 2022 पासून भाडेपट्टीवर दिली आहे. त्या जागेत व्यवसाय करण्यासाठी संबंधित कंपनीने आवश्यक परवाने घेण्याची गरज आहे. जागा भाडेपट्टीच्या करारामध्ये सर्व गोष्टीचा समावेश करण्यात आलेला आहे, असे तारक आरोलकर यांनी म्हटले आहे.
कसे चालवले जात होते बोगस कॉल सेंटर?
कोलवाळ येथील कविश रेसिडेन्सीमध्ये हे बोगस कॉल सेंटर सुरू करण्यात आले होते.
या सेंटरमधील कर्मचारी आपण ॲमेझॉन सेवा केंद्राचे कर्मचारी असल्याचे भासवत होते. त्यांना अमेरिकेतील ॲमेझॉनच्या ग्राहकांकडून ॲमेझॉनवरील खरेदीबाबत फोन कॉल येत होते.
या बोगस सेंटरमधील कर्मचाऱ्यांकडून ॲमेझॉन ग्राहकांची वैयक्तिक माहिती, बँक अकाऊंटबाबत सविस्तर माहिती घेतली जात होती.
ग्राहकांकडून या बोगस सेंटरच्या बँक अकाऊंटमध्ये पैशांचा भरणा केला जात होता. तसेच, या सेंटरमधून ग्राहकांचे अमेझॉन अकाऊंट हॅक करून अमेरिकन नागरिकांना सर्रास फोन कॉल्स केले जात होते.
अज्ञात व्यक्तीकडून इलेक्ट्रॉनिक महागड्या खरेदीसाठी ऑर्डर दिली आहे का, अशी विचारणा करून त्यानंतर ग्राहकांकडून त्यांची अधिक माहिती मिळवत फसवणूक केली जात होती.