बोगस डॉक्टरकडून गंडा : तपासात अनेक गोष्टींचा उलगडा

0
92

नोकरीचे आमिष दाखवून ४७ जणांकडून २५ लाख रुपये उकळल्याप्रकरणी कुडचडे पोलिसांनी काल शनिवार दि. ४ रोजी रिवण येथे जाऊन पंचनामा केला व ऑफिसवजा प्रशिक्षण केंद्रातील सर्व सामान जप्त करून ते कुडचडे येथे आणले आहे. याप्रकरणी प्रमुख संशयित पूजा शंके सध्या पोलीस कोठडीत आहे.
जप्त केलेल्या सामानात खाटी, कपाटे, काऊंटर, टेबले, खुर्च्या, लस टोचणीचे सिरींज, ड्रीप लावण्यासाठी वापरण्यात येणारे स्टॅण्ड, औषधे, विविध प्रकारची रुग्ण तपासणीची यंत्रे यांचा समावेश आहे.
उपलब्ध माहितीप्रमाणे या बोगस डॉक्टरने कुडचडे येथील एका स्टेशनरी दुकानातून स्टेशनरी नेली होती. त्याचप्रमाणे त्याच्याकडून डॉक्टराचे रबर स्टँपही बनवून घेतल्याचे उघड झाले असून आलिशान गाडीतून येऊन अल्पवयीन आरोपी स्टेशनरी ऑर्डर देत होता. सध्या या स्टेशनरी दुकानदाराचे सुमारे ५१ हजार रुपये देणे असल्याचे त्याचे म्हणणे आहे. अल्पवयीन येताना सूट घालून आलिशान गाडीतून यायचा त्यामुळे त्याचा कधीच संशय आला नाही तसेच उधारीही दिली, असे दुकानदाराने सांगितले. आता स्टेशनरीवाल्यालाही ५१ हजारांना गंडा पडला असून बोगस रबर स्टॅम्प करून दिल्या प्रकरणीही त्याला पोलिसात हेलपाटे घालण्याची पाळी आली आहे. दरम्यान, कुडचडे पोलिसांनी ज्यांच्याकडून पैसे उकळण्यात आले त्या सर्व ४७ जणांना येत्या ७ ऑक्टोबर रोजी पोलीस स्टेशनवर बोलावले असून त्यादिवशी आरोपी व त्यांची समोरासमोर जबानी घेतली जाणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
कुडचडे येथील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये पूजा या नावाची एक डॉक्टर असून या बोगस डॉक्टरांनी नोकरीचे आमिष दाखविलेल्या व्यक्तींना सदर डॉक्टरचा फोन क्रमांक दिला होता. काही जणांकडून त्या खर्‍या डॉक्टरना फोन येऊ लागल्याने तिने थेट कुडचडे पोलीस स्टेशन गाठले व ज्या क्रमांकावरून तिला कॉल आले होते त्यांची माहिती काढून त्यांना बोलावून घेतल्यानंतर हे बिंग फुटले. त्यातच त्याच ठिकाणी खाजगी हॉस्पिटलात काम करणारी नर्स सुप्रिया देसाई ही या जाळ्यात अडकल्याने तिने या बोगस डॉक्टरांविरुद्ध रितसर तक्रार नोंद केली आहे.
डॉक्टर असल्याचा बहाणा करून लुबाडलेला संशयित अल्पवयीन आरोपी हा नॉन मॅट्रीक असून त्याची घरची परिस्थिती एकदम हालाखीची आहे. यापूर्वी त्याने आपल्या आईचे मंगळसूत्रही विकले असल्याची माहिती उघड झाली आहे.

बोगस डॉक्टरला ४ दिवस रिमांड

४७ जणांना नोकरीचे आमिष दाखवून २५ लाख २१ हजार रुपयांना गंडा घातलेल्या झरीवाडा दवर्ली येथील पूजा दामोदर शंके (३३) या महिलेला केपे न्यायालयाने आणखी चार दिवसांच्या रिमांडवर कुडचडे पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. दरम्यान, काकोडा येथील दुसरा एक अल्पवयीन साथीदार अपना घरात आहे. कुडचडे पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतले होते.
आपण डॉक्टर असल्याचे भासवून या दोघांनीही रिवण येथे नर्सिंगचे प्रशिक्षण केंद्र उघडून लोबो निवास या फिलिप लोबो यांच्या घरात त्यांनी पहिल्या मजल्यावर खोली ९ हजार रुपये महिना भाड्याने घेऊन तेथे नर्सिंग प्रशिक्षण केंद्र उघडले होते.
या केंद्रातून प्रशिक्षण घेतल्यानंतर बांबोळी येथील गोवा मेडिकल हॉस्पिटलमध्ये फार्मासिस्ट म्हणून नोकरी देण्यात येणार अशी बतावणी करून एकूण ४७ जणांकडून २५ लाख २१ हजार रुपये उकळले होते. पंचवाडी शिरोडा येथील सुप्रिया शामराव देसाई हिने या प्रकरणात कुडचडे पोलिसांत लेखी तक्रार केल्यानंतर कुडचडे पोलिसांनी महिलेला अटक केली होती.