बोगमाळो येथील रंघवी इस्टेटमधील एका बंगल्यात काल पहाटे ७ दरोडोखोरांनी दरोडा घालून सुवर्णालंकार व रोख रकमेसह अंदाजे ६ लाख रुपयांच्या ऐवजावर डल्ला मारला. या दरोड्यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
बोगमाळो रंघव इस्टेटमधील शेख अल्ताफ यांच्या मालकीच्या बंगल्यात सात दरोडेखोरांनी काल पहाटे ३ ते ४च्या दरम्यान स्वयंपाक घराच्या खिडकीचे ग्रील्स तोडून हल्लीच २३ डिसेंबर रोजी या बंगल्यात पहिल्या मजल्यावर राहण्यासाठी आलेल्या एका नवविवाहीत जोडप्याच्या खोलीत प्रवेश केला. शाळेला सुट्टी असल्याने या बंगल्याचे मालक अल्ताफ शेख आपल्या परिवारासमवेत साखळी येथे नातेवाईकांकडे गेले होते. यावेळी बंगल्यात कोणी नसल्याची संधी साधून अज्ञात दरोडेखोरांनी खिडकीचे ग्रील्स तोडून या नवदांपत्याच्या खोलीत प्रवेश केला. त्यानंतर जोडप्याला पकडून धमकावले. त्यावेळी जोडप्याने आम्हांला मारू नका अशी दरोडेखोरांकडे विनवणी केली. पाहिजे असल्यास आमचे दागिने घ्या असेही त्या दरोडेखोरांना सांगितले. त्यानंतर दरोडेखोरांनी त्यांच्या अंगावरील सर्व दागिने काढून घेतले.
चार दिवसांपूर्वीच हे नवदांपत्य विवाहबद्ध होऊन या फ्लॅटमध्ये राहण्यास आले होते. यावेळी अवदेश शर्मा यांच्या पत्नीच्या अंगावर सुवर्णलंकार होते. दरोडेखोरांनी फ्लॅटमध्ये प्रवेश करताना तोंडे स्कार्फने झाकली होती. फ्लॅटमध्ये शिरल्यानंतर या चोरट्यांनी पतीपत्नीला घट्ट पकडले. तसेच पती पत्नीचे पाय खाटेला बांधून त्यांचे दागिने काढले. तसेच घरातील रोख रक्कम व इतर मौल्यवान वस्तू लंपास केल्या. जाताना त्यांनी चोरीची वाच्यता न करण्याचीही धमकीही दिली. त्यानंतर ते बाहेरच्या दरवाजाला कडी लावून पसार झाले. ही चोरी केल्यानंतर दरोडेखोरांनी बंगल्याचे मालक अल्ताफ शेख यांच्या बंगल्यात चोरी करून दोन सोनसाखळ्या व २ अंगठ्या मिळून ६० हजार रुपयांचे दागिने पळविले. या दरोडेखोरांनी जाताना इतर शेजार्यांच्या घरांना बाहेरून कडी घातली व पसार झाले. काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारच्या दोन-तीन चोर्या झाल्याने या भागातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.