बोंडला प्राणिसंग्रहालयाच्या मास्टर प्लॅनला मंजुरी

0
6

>> केंद्रीय पर्यावरण, वन मंत्रालयाकडून मान्यता; वनमंत्री विश्‍वजीत राणे यांची माहिती

केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने राज्यातील एकमेव बोंडला प्राणिसंग्रहालयाच्या मास्टर प्लॅनला मंजुरी दिली आहे, अशी माहिती वनमंत्री विश्‍वजीत राणे यांनी काल दिली.
या मास्टर प्लॅनमुळे राज्याचे धोरणात्मक दृष्टिकोन आणि संवर्धन अभियान राबविण्यास मदत होईल. या मास्टर प्लॅनद्वारे प्राणिसंग्रहालयाच्या सर्वांगीण आणि एकात्मिक विकासावर भर दिला जाणार आहे. मुंबईतील भायखळा प्राणिसंग्रहालयाप्रमाणेच बोंडला प्राणिसंग्रहालय हे पर्यटक आणि स्थानिक दोघांनाही आकर्षित करणारे एक अनोखे ठिकाण बनवणे हे आमचे ध्येय आहे, असे राणे यांनी सांगितले.

तसेच सर्वसमावेशक प्राणिसंग्रहालय बनवण्यासाठी आम्हांला इतर राज्यांकडून काही प्रजाती मिळवून देण्यात येणार आहेत, असेही राणे यांनी म्हटले आहे. बोंडला प्राणिसंग्रहालयाच्या मास्टर प्लॅनबाबत वन खात्याचे वरिष्ठ वनअधिकारी आनंद जाधव, सौरव कुमार आणि परेश परब यांच्याशी चर्चा केली आहे. नवी दिल्ली येथे केंद्रीय वन मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेऊन आपण बोंडला प्राणिसंग्रहलायाच्या मास्टर प्लॅनबाबत सविस्तर चर्चा करणार आहे, असे राणे म्हणाले.

केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या १०६ व्या तांत्रिक बैठकीत बोंडला मास्टर प्लॅनला मान्यता देण्यात आली आहे. तांत्रिक समितीने प्लॅनबाबत निरीक्षणे नोंदविली असून, प्लॅनमध्ये आवश्यक सुधारणा करण्याची सूचना केली आहे. प्लॅनमध्ये प्राण्याची यादी, संग्रहालयासाठी मंजूर कर्मचारी, संग्रहालयासाठी आणखी लागणारे कर्मचारी आदी माहितीबाबत सुधारणा करण्याची सूचना केली आहे.

बोंडला हे राज्यातील एकमेव प्राणिसंग्रहालय आहे. या प्राणिसंग्रहालयात आवश्यक सुधारणा करण्याची गरज आहे. या प्राणिसंग्रहालयाचा दर्जा सुधारण्यासाठी गेली काही वर्षे प्रयत्न होत आहे. तथापि, आत्तापर्यंत प्राणिसंग्रहालय दुर्लक्षित राहिलेले आहे. या संग्रहालयाला राज्यातील शालेय विद्यार्थी, पर्यटक भेट देतात.