‘बोंडला’तील सुधारणांसाठी 150 कोटींची गरज

0
37

>> प्राणी संग्रहालयाची स्थिती खूपच वाईट; वनमंत्री विश्वजीत राणे यांची कबुली

बोंडला प्राणी संग्रहालयाचा दर्जा सुधारण्यासाठी तब्बल 150 कोटी रुपयांची गरज असून, हे काम हाती घेता यावे यासाठी राज्य सरकारची केंद्र सरकारसोबत चर्चा चालू आहे, अशी माहिती वनमंत्री विश्वजीत राणे यांनी काल विधानसभेत दिली. प्रश्नोत्तराच्या तासाला काल आम आदमी पक्षाचे आमदार क्रूझ सिल्वा यांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना राणे यांनी वरील माहिती दिली.
यावेळी राणे यांनी सदर प्राणी संग्रहालयाची स्थिती खूप वाईट असल्याचे मान्य केले. मात्र, त्याचबरोबर या प्राणी संग्रहालयासाठीच्या मास्टर प्लानला केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाने मान्यता दिली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी बोलताना क्रूझ सिल्वा यांनी पूर्वी बोंडला प्राणी संग्रहालयाचा दर्जा चांगला होता. आणि शालेय विद्यार्थी तसेच पर्यटक व स्थानिक लोक या प्राणी संग्रहालयाला भेट द्यायचे. मात्र, आता लोकांनी या प्राणी संग्रहालयाकडे पाठ फिरवली असल्याचे सिल्वा यांनी सांगितले.
यावेळी प्रश्न विचारताना आमदार विजय सरदेसाई यांनी पीपीपी तत्त्वावर हे काम हाती घेण्याचा विचार आहे का, असा प्रश्न केला. त्यावर तसे करण्यास परवानगी नाही, असे राणेंनी स्पष्ट केले.

बोंडला फाऊंडेशनची स्थापना
बोंडला प्राणी संग्रहालयात सुधारणा घडवून आणण्याची गरज आहे. आणि त्यासाठी केंद्र सरकारकडे बोलणी चालू आहे. विनाविलंब सुधारणांसाठी आता ‘बोंडला फाऊंडेशन’ची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती यावेळी विश्वजीत राणे यांनी दिली. फाऊंडेशनची स्थापना करण्यात आली असल्याने सीएसआरखाली या प्राणी संग्रहालयाला आर्थिक मदत मिळवणेही शक्य होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एखादी खासगी कंपनी तसेच महामंडळही या प्राणी संग्रहालयासाठी निधी देऊ शकतील, असे त्यांनी सांगितले.

प्राणी दत्तक योजना सुरू करणार : राणे
बोंडला अभयारण्यासाठी बोंडला फाऊंडेशनखाली प्राणी दत्तक योजना सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती विश्वजीत राणे यांनी दिली. याद्वारे समाजासाठी काही तरी करू इच्छिणाऱ्या व्यक्ती प्राण्यांना दत्तक घेऊ शकतील. मात्र, त्यांना बोंडला प्राणी संग्रहालयातील प्राण्यांना आपल्या घरी नेता येणार नाही. तसेच सीएसआरखाली कंपन्यांही बोंडलासाठी निधी देऊ शकतील, असेही राणे यांनी स्पष्ट केले.