‘बॉयकॉट मालदीव’ ट्रेंडनंतर मालदीवमधून आता माफीनामे

0
15

मालदीवमधील तीन मंत्र्यांनी भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेली अपमानास्पद टीका आणि भारतीय नागरिकांवर केलेल्या वर्णद्वेषी टीकेनंतर भारतात मालदीवविरोधात संतापाचे वातावरण आहे. तसेच भारतीय नागरिकांनी आणि पर्यटन कंपन्यांनी मालदीववर बहिष्कार टाकण्यास सुरुवात केली आहे. काही कंपन्यांनी तर मालदीवचे बुकिंग्स रद्द केले आहेत. त्यामुळे एका बाजूला भारत सरकारचा रोष आणि दुसऱ्या बाजूला भारतीय नागरिकांची ‘बॉयकॉट मालदीव’ ही मोहीम पाहता मालदीवमधून माफीनामे येऊ लागले आहेत.

मालदीवच्या खासदार इवा अब्दुल्ला यांनी मालदीवमधील मंत्र्यांनी केलेली वक्तव्ये ‘लाजिरवाणी आणि वर्णद्वेषी’ असल्याचे म्हणत आपल्याच सरकारला खडसावले. या लाजिरवाण्या वक्तव्यांप्रकरणी आपण भारतीय नागरिकांची माफी मागते, असे इवा अब्दुल्ला यांनी म्हटले आहे. तसेच, मालदीववरील बहिष्कार मोहीम थांबवण्याची विनंती केली आहे. दरम्यान, मालदीवचे माजी युवा कल्याण आणि क्रीडामंत्री अहमद महलूफ यांनी देखील भारताची माफी मागितली आहे.