बॉम्बच्या माहितीनंतर ‘अमरावती एक्सप्रेस’ सावर्डे स्थानकावर थांबवली

0
121
रेल्वेतील प्रवाशांना उतरवून दूरवर उभे केले होते., सावर्डे-कुडचडे रेल्वे स्थानकावर बॉम्बचा शोध घेताना बॉम्ब निकामी करणारे पथक, बोगस माहिती देणार्‍याला पकडून देताना.(छाया : प्रहर सावर्डेकर)

अफवा सिद्ध ; एकजण ताब्यात
हावडा ते वास्कोपर्यंत धावणार्‍या अमरावती एक्सप्रेस रेल्वे गाडीत बॉम्ब ठेवल्याची माहिती एकाने कुळे पोलीस स्थानकावर दिल्यानंतर पोलिसांची एकच धावपळ उडाली. त्यानंतर सूचनेनुसार ही रेल्वे कुडचडे पोलीस व रेल्वे अधिकार्‍यांनी सावर्डे-कुडचडे स्थानकावर अडवून तपास केला असता बॉम्ब ठेवल्याची माहिती अफवा असल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, पोलिसांनी माहिती दिलेल्या विश्‍वास बागी या झारखंडच्या व्यक्तीला रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले.
हावडा ते वास्को ही अमरावती एक्सप्रेस गाडी काल दुपारी २ वाजता कुळे रेल्वे स्थानकावरून सुटल्यावर मूळ झारखंड येथील एका व्यक्तीने कुळे पोलीस स्थानकावर जाऊन रेल्वे गाडीच्या दुसर्‍या क्रमांकाच्या डब्यात सामान ठेवण्यात येते त्या ठिकाणी एका पिशवीत बॉम्ब ठेवला असल्याचे सांगितले. कुळे पोलिसांनी लगेच कुडचडे पोलिसांना २.२७ वा. फोन करून माहिती दिली असता कुडचडे पोलीस निरीक्षक रवींद्र देसाई यांनी पोलीस कुमक घेऊन रेल्वे स्थानकावर धाव घेतली.
रेल्वे अधिकार्‍यांना या प्रकरणाची माहिती देण्यात आल्यानंतर त्यांनी तात्काळ कुडचडे-सावर्डे रेल्वे स्थानकावर गाडी थांबवण्याचे आदेश दिले. गाडी स्थानकावर पोहोचताच गाडीतील सर्व प्रवाशांना उतरवून त्यांना स्थानकाबहेर नेण्यात आले. याच दरम्यान बॉम्ब निकामी करणार्‍या पथकाला व स्वानपथकाला त्याचप्रमाणे अग्नीशामक दल यांना पाचारण करण्यात आले. ही सर्व पथके लगेच घटनास्थळी दाखल झाली व त्यानी डब्यांची तपासणी केली. मात्र बॉम्ब ठेवल्याची अफवाच असल्याचे निष्पन्न झाले.
बॉम्बची माहिती देणारा ताब्यात
पोलिसांनी बॉम्ब ठेवल्याची माहिती देणार्‍या झारखंड येथील विश्‍वास बागी याला रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले असून सदर व्यक्तीची जबानी घेतली असता त्याने प्रथम दोन क्रमांकचा डबा दाखविला नंतर तीन क्रमांकाचा डबा दाखविला व शेवटी एक क्रमांकात बॉम्ब ठेवला असल्याचे सांगितले. मात्र सदर व्यक्ती वेडसर असल्याचे दिसत असून त्याची कसून चौकशी करण्यात येणार असल्याचे रेल्वे पोलीस उपनिरीक्षक शरीफ जॅकीस यांनी सांगितले.
कुडचडे पोलीस निरीक्षक रवींद्र देसाई यांनी माहिती देताना सांगितले की , आपणास कुळेहून २ वाजून २७ मिनिटांनी फोन आला. त्यानंतर धावपळ करून सर्व यंत्रणेला माहिती दिली. सावर्डे कुडचडे रेल्वे स्थानकावर गाडी दुपारी २.२८ वा. पोहोचली होती. बॉम्ब पथक व श्‍वान पथकाच्या अधिकार्‍यांनी सर्व डब्यांची बारकाईने झडती घेतली असता त्यांना संशयास्पद काहीच दिसून आले नाही. त्यानंतर पोलिसांनी रेल्वे अधिकार्‍यांना रेल्वेत काहीच नसल्याचे लेखी दिल्यानंतर सदर गाडी ४ वाजून २५ मिनिटांनी सोडण्यात आली. या सर्व प्रकारामुळे प्रवाशांना मात्र बराच मनस्ताप झाला.