बेशिस्तीचे दर्शन

0
167

प्रदेश कॉंग्रेसच्या शिस्तभंग समितीने पक्षविरोधी कारवायांबद्दल जाब विचारलेल्या नेत्यांनी पाठ फिरवल्याने समितीच्या बैठकीचाच बोजवारा उडाला. प्रदेश कॉंग्रेसला पक्षाचे आमदार आणि नेते काय किंमत देतात हेच त्यातून दिसून आले आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात काम केल्याचा ठपका फ्रान्सिस सार्दिन, वालंका आलेमाव आणि ज्योकीम आलेमाव यांच्यावरच नव्हे, तर खुद्द पक्षाचे उत्तर गोव्याचे लोकसभा उमेदवार रवी नाईक यांच्यावरही पक्षाने ठेवलेला आहे. सार्दिन यांनी आपल्या पुत्रासाठी शेलॉमसाठी काम केले असा ठपका कॉंग्रेसने ठेवला असला तरी प्रत्यक्षात दक्षिण गोव्याची उमेदवारी फ्रान्सिस सार्दिन यांच्या गळ्यात पडणार हे निश्‍चित झालेले असताना अगदी ऐनवेळी आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घालून सार्दिन यांना अपमानीत करण्यात आले, त्याची परिणतीच शेलॉम यांच्या उमेदवारीत झाली ही पार्श्वभूमीही दुर्लक्षिता येत नाही. चर्चिल आलेमाव यांच्या बाबतीतही तेच घडले. त्यांनी स्वतःचे राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी तृणमूल कॉंग्रेसची उमेदवारी पटकावली. बंधू ज्योकीम आणि कन्या वालंका यांच्यावर चर्चिलसाठी काम केल्याचा ठपका आता कॉंग्रेसने ठेवलेला आहे. रवी नाईक यांच्यावरचा आरोप तर कमालच आहे. स्वतःच्याच विरोधात त्यांनी काम केले आणि शेवटच्या क्षणी ते निवडणुकीच्या मैदानातून पळ काढून भाजपाला जाऊन मिळाले असा ठपका कॉंग्रेसने त्यांच्यावर ठेवलेला आहे. मुळात रवींसाठी पक्षाच्या आमदारांनीही काम केले नव्हते आणि निवडणुकीत त्यांच्यासाठी पक्ष संघटनाही वावरताना दिसत नव्हती. पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवला गेलेल्या या चारही नेत्यांचा भर आपण कसे पक्षनिष्ठ आहोत आणि प्रदेशाध्यक्षांनी आपल्याला कशी अवमानास्पद वागणूक दिली यावर असेल हे स्पष्ट आहे. ‘हेचि फळ काय मम तपाला?’ असा प्रतिसवाल ते दिग्विजयसिंहांपुढे करतील. सर्वांत मोठा विनोद म्हणजे पक्षाची शिस्तभंग समितीही एकसंध असल्याचे दिसत नाही. विरोधी पक्षनेते आणि पक्षाचे ज्येष्ठतम नेते प्रतापसिंह राणे हे या समितीचे सदस्य असून बैठकीला फिरकले नाहीत आणि प्रदेशाध्यक्षपदी जॉन फर्नांडिस असेपर्यंत कॉंग्रेस हाऊसमध्ये पाय ठेवणार नाही अशी त्यांची भीष्मप्रतिज्ञा आहे. शिस्तभंग समितीचे निमंत्रक जितेंद्र देशप्रभू यांनी खरे तर समितीची बैठक बोलवायची, पण त्यांनाच एसएमएसवर निमंत्रण पाठवले गेले. म्हणजे येथे प्रदेशाध्यक्ष जॉन फर्नांडिस यांच्या आले मना तेथे कोणाचे चालेना अशीच परिस्थिती कॉंग्रेस पक्षात निर्माण झालेली दिसते. खुद्द पक्षाच्या मुख्यालयामध्ये आपल्याच पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यावर लाचखोरीचा गंभीर आरोप करण्याची मुभा त्यांनी भालचंद्र नाईक यांना दिली होती. कॉंग्रेसमधील या सगळ्या लाथाळ्या पाहिल्या तर कींव येते. एकीकडे राज्य विधानसभेचे अधिवेशन तोंडावर आलेले आहे आणि दुसरीकडे विधिमंडळ गट आणि प्रदेश कॉंग्रेस यामध्ये कमालीचा विसंवाद आणि अविश्वास निर्माण झालेला दिसतो आहे. विधानसभेत सरकारला घेरण्यासाठी कॉंग्रेस आमदार कंबर कसतील असे प्रदेशाध्यक्ष जॉन फर्नांडिस सांगत असले, तरी या आमदारांची तोंडे चार दिशांना आहेत. काही आमदारांनी विधानसभेत आक्रमकता दाखवली तरी ती केळ दिल्लीश्वर श्रेष्ठींना आणि त्यांचे दूत दिग्विजयसिंह यांना आपण सक्रिय आहोत हे दाखविण्यासाठीच असेल. दिग्विजयसिंह लवकरच गोव्यात दाखल होणार आहेत आणि त्यांच्यापुढे पक्षाच्या आमदारांकडून प्रदेशाध्यक्षांना हटवा ही मागणीच लावून धरली जाण्याची चिन्हे दिसत आहेत. पक्षामध्ये नव्या चेहर्‍यांना स्थान देणे वगैरे राहुल गांधींच्या कल्पना कागदावर जरी आदर्शवत असल्या, तरी प्रत्यक्षात ते सोपे नसते. परंतु येथे तर पक्षाचे सगळे विद्यमान नेते निकाली काढून नव्या चेहर्‍यांना पुढे आणण्याचा आटापिटा प्रदेशाध्यक्ष करताना दिसत आहेत. तळागाळात काम केल्याखेरीज नेतेपद एकाएकी आकाशातून चालत येत नसते. असे उभरते नेतृत्व निर्माण करण्याच्या दिशेने पावले टाकण्याआधीच पक्षाच्या विद्यमान नेत्यांना एकेक करून दूर सारण्याचे काम प्रदेशाध्यक्षांनी हाती घेतलेले दिसते. त्यामुळे नवे नेतृत्व तयार होणे दूरच, उलट पक्षाची ढासळती कमान सांभाळू शकतील अशा नेत्यांनाच दूर सारणे हे शेखचिल्लीचेच कृत्य ठरते.