गणेश चतुर्थीनिमित्त बेळगाव व कारवार येथील आपल्या मूळ गावी जाणार्या लोकांसाठी कदंब महामंडळाने विशेष गाड्यांची सोय केली असल्याचे कदंब महामंडळाचे माहिती अधिकारी एस. एल. घाटे यांनी काल सांगितले. आज गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी वरील दोन्ही ठिकाणी या विशेष बसेस धावणार आहेत.
बेळगाव जाणार्या प्रवाशांसाठी ५ विशेष बस गाड्यांची तर कारवारला जाणार्या प्रवाशांसाठी १२ विशेष बसेसची सोय करण्यात आली आहे. या विशेष बसगाड्यांमुळे कारवारला जाणार्या अतिरिक्त १ हजार तर बेळगावला जाणार्या ३५० अतिरिक्त प्रवाशांची सोय होणार असल्याचे घाटे यांनी यावेळी सांगितले. या विशेष बसगाड्यांचे तिकीट दर किंचित जास्त ठेवण्यात आले आहेत. एरव्ही कारवारला जाण्यासाठीची तिकीट ७० रु. आहे. पण विशेष बसमधून चतुर्थीला जाणार्यांना तिकिटासाठी १०० रु. मोजावे लागणार आहेत. बेळगावला जाण्यासाठीचे तिकीट दर १४० रु. एवढे आहेत. मात्र, विशेष बसमधून जाणार्यांना तिकिटासाठी २०० रु. मोजावे लागणार आहेत, असे घाटे यांनी सांगितले. कदंब महामंडळाच्या रोज २८ बसेस गोव्याहून कारवारला जात असतात. मात्र, कारवाचे लोक मोठ्या संख्येने गोव्यात असल्याने चतुर्थीच्या वेळी या बसेस अपुर्या पडत असल्याचे दिसून आल्याने गेल्या एक-दोन वर्षांपासून विशेष गाड्या सोडण्यात येत असतात. बेळगावला रोज कदंबच्या १२ बसेस गोव्यातून जात असतात.