बेरोजगारी, म्हादईवरून सरकारला अधिवेशनात घेणार

0
12

युरी आलेमाव; विरोधी आमदारांच्या बैठकीत रणनीती तयार

विधानसभेच्या आगामी अधिवेशनाची रणनीती आखण्यासाठी विरोधी पक्षांच्या आमदारांची काल पर्वरी येथील विधानसभा संकुलात बैठक पार पडली. विरोधी पक्षनेत्याच्या चेंबरमध्ये ही बैठक झाली. अर्थसंकल्पीय अधिवेशनात बेरोजगारी, म्हादई, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आदींसह राज्यातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर सरकारला विरोधी पक्षांचे आमदार एकजुटीने घेरणार आहेत, अशी माहिती विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना काल दिली.

या बैठकीला विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्यासह काँग्रेसचे आमदार ॲड. कार्लुस फेरेरा, एल्टन डिकॉस्टा, आपचे व्हेन्झी व्हिएगश, क्रुझ सिल्वा, गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई आणि आरजीचे विरेश बोरकर यांची उपस्थिती होती. गोवा विधानसभेच्या 2 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या आगामी 6 दिवसीय विधानसभेच्या अधिवेशनाबाबत विरोधी पक्षांची रणनीती यावेळी ठरविण्यात आली.
सहा दिवसांचे अधिवेशन जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी अपुरे आहे. सरकारने विरोधकांच्या प्रश्न मांडण्याच्या हक्कावर नियंत्रण आणण्यासाठी अधिवेशन कमी दिवसांचे ठेवले आहे, असा आरोप आलेमाव यांनी केला.
सत्ताधाऱ्यांचा एक आणि विरोधकांचा एक असे प्रश्न मांडण्याच्या सूत्राचे सभापतींनी पालन न केल्यास अधिवेशनावर बहिष्कार टाकण्याचा इशारा आलेमाव यांनी दिला.

राज्य सरकारची आर्थिक स्थिती चांगली नाही. केंद्र सरकारकडून विकासकामांसाठी मिळणाऱ्या निधीच्या वापराबाबतची प्रमाणपत्र केंद्रीय मंत्रालयाला पाठविली जात नाहीत ही एक गंभीर बाब आहे. येथील सरकारी यंत्रणा अकार्यक्षम बनलेली आहे, अशी टीका विजय सरदेसाई यांनी केली.

दरम्यान, गोवा फॉरवर्ड पक्ष लोकसभा निवडणुकीत उतरणार नाही. इंडिया आघाडीच्या नेत्यांनी पाठिंब्यासाठी संपर्क साधलेला नाही. त्यामुळे आघाडीत सहभागी व्हायचे की नाही याबाबत निर्णय अजूनपर्यंत घेतलेला नाही, असे विजय सरदेसाई यांनी सांगितले.