बेरोजगारांच्या नेमक्या आकडेवारीसाठीच ऑनलाईन रोजगार नोंदणीचे काम

0
122

>> कॉंग्रेसच्या आरोपावर सरकारचा खुलासा

राज्यात सध्या नक्की कितीजण बेरोजगार आहेत हे जाणून घेण्यासाठीच रोजगार विनिमय केंद्राने ऑनलाईन नोंदणी करण्याचे काम हाती घेतले होते, असा खुलासा काल सरकारने एका पत्रकाद्वारे केला आहे.

राज्यातील रोजगार विनिमय केंद्रात नावनोंदणी असलेल्या १ लाख २० हजार उमेदवारांची नावे सरकारने रद्द केल्याविषयी रविवारी प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केलेल्या आरोपासंबंधी सरकारने हा खुलासा केलेला असून गेल्या बर्‍याच वर्षांपासून मडगाव व पणजी येथील रोजगार विनिमय केंद्रात जाऊन बेरोजगार युवकांना आपली नोंदणी करावी लागत आहे, असे म्हटले आहे. तेथे गेल्यावर त्यांची प्रमाणपत्रे तपासण्यात येत असत. प्रत्येक उमेदवारांच्या प्रमाणपत्रांची तपासणी केल्यानंतर त्यांची बेरोजगार म्हणून नोंदणी करून त्यांना कार्डे देणे अथवा त्यांच्या कार्डांचे नूतनीकरण करणे ही कामे केली यायची, असा खुलासा कामगार आयुक्त जयंत तारी यांनी केला आहे.

ही सगळी प्रक्रिया ही प्रचंड लांबलचक व वेळखाऊ अशी होती. रोजगार विनिमय अधिकार्‍यांचीही हे किचकट काम करताना तारांबळ उडत असे. तेथे १,२५००० बेरोजगारांची नावे होती. मात्र, या सगळ्या माहितीचे डिझिटलायझेशन न झाल्याने व तो ऑनलाईन उपलब्ध नसल्याने सगळ्यांची माहिती मिळवणे हे फार कठीण काम होऊन बसले होते. तेथे काम करणार्‍या अधिकार्‍यांना या उमेदवारांची माहिती गोळा करण्याचे काम सोडून अन्य कोणतेही काम करता येत नसे. या विद्यार्थ्यांचे करिअर काउन्सिलिंग करणे, त्यांना व्यावसायिक मार्गदर्शन देणे आदी कामे करता येत नसत. या पार्श्‍वभूमीवर सरकारने रोजगार विनिमय केंद्रात ऑनलाईन नावनोंदणी करण्याचे काम हाती घेण्याचा निर्णय घेतल्याचे खात्याने काल जारी केलेल्या पत्रकातून म्हटले आहे.

केंद्रात नावनोंदणी झालेले जे १२५००० उमेदवार होते त्यापैकी बरेच जण हे सरकारी नोकरीसाठी वयोमर्यादा ओलांडून गेलेले, बरेचजण खासगी नोकरी करणारे तर काही जण दोन-दोन, तीन-तीन वेळा नोंदणी झालेले होते.
राज्यात सध्या नक्की किती जण बेरोजगार आहेत हे जाणून घेणे हेच ऑनलाईन नोंदणी करण्यामागील कारण होते, असे सरकारने स्पष्ट केले आहे.
पणजीतील रोजगार विनिमय केंद्र हे आता एक आदर्श व्यवसाय केंद्र बनले असून या केंेद्राद्वारे व्यवसाय मार्गदर्शन, व्यवसाय चर्चा, तसेच उमेदवारांना हवी असलेली सगळी माहिती देणे तसेच त्यांना कुशलता मार्गदर्शन देणे आदी कामे हाती घेण्यात येत असल्याचेही या पत्रकातून नमूद करण्यात आले आहे.