>> नॅशनल रजिस्ट्रेशन ऑफ अनएम्प्लॉयडची युवक कॉंग्रेसची मागणी
केंद्र सरकारने सीएए, एनआरसी व एनपीआर ऐवजी ‘एनआरयू’ (नॅशनल रजिस्ट्रेशन ऑफ अनएम्प्लॉयड) आणावे अशी मागणी काल युवक कॉंग्रेसने पत्रकार परिषदेत केली.
भारतीय युवक कॉंग्रेसने भारतभरातील बेरोजगार युवक-युवतींचा ‘डेटा’ गोळा करता यावा यासाठी २८ जानेवारी रोजी मोबाईल वाहिनी सुरू केली असून तिचा क्रमांक ८१५१९९४४११ असा आहे. जे बेरोजगार या वाहिनीवर मीस्ड कॉल करतील त्या बेरोजगारांची सदर वाहिनीवर नोंदणी होणार असून त्याद्वारे भारतभरात कितीजण बेरोजगार आहेत त्याची संख्या उपलब्ध होणार असल्याची माहिती गोवा प्रदेश युवक कॉंग्रेस अध्यक्ष वरद म्हार्दोळकर यांनी काल दिली.
गरीबी, बेरोजगारी, आर्थिक मंदी, महागाई आदी महत्त्वाच्या मुद्द्यांवरून लोकांचे अन्यत्र लक्ष वळवण्यासाठी मोदी सरकार सीएए, एनआरसी, एनपीआर आदी गोष्टी लागू करू पाहत असल्याचा आरोप म्हार्दोळकर यांनी यावेळी केला.
पर्रीकरांच्या ५० हजार
नोकर्या कुठे गेल्या?
मनोहर पर्रीकर यांनी मुख्यमंत्री असताना ५० हजार नोकर्या देण्याचे आश्वासन जनतेला दिले होते. यापैकी किती नोकर्या आतापर्यंत राज्यातील युवकांना देण्यात आल्या त्याची माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी लोकांना द्यावी, अशी मागणीही म्हार्दोळकर यांनी यावेळी दिली.
सरकारी नोकरभरती तर बंद झालेली आहे. शिवाय खासगी क्षेत्रातही नोकर्या उपलब्ध नाहीत. सरकारला राज्यात एकही मोठा उद्योग आणता आला नसल्याचा आरोप म्हार्दोळकर यांनी यावेळी केला.