बेपत्ता विमानातील ४० मृतदेह सापडले

0
76

जावा समुद्रात विमानाचे अवशेषही मिळाले
अखेर तीन दिवसांच्या शोध मोहिमेनंतर काल इंडोनेशियानजीक जावा समुद्रात बेपत्ता झालेल्या एअर एशिया विमानाच्या अवशेषांसह ४० मृतदेह शोध पथकांनी ताब्यात घेतले. मात्र सदर विमान दुर्घटनाग्रस्त होण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. दुर्दैवी विमानावर एकूण १६२ जण होते.इंडोनेशियाच्या नौदल अधिकार्‍यांनी सांगितले की एका युध्द नौकेने ४० मृतदेह समुद्रातून वर काढले असून आणखी मृतदेह वर काढण्याच्या कामात पथके गुंतली आहेत. रविवारी सकाळी विमान बेपत्ता झाल्यानंतर इंडोनेशियाच्या हद्दीतील बोर्निओ येथील भागात त्याचा रडारवरील संपर्क तुटला होता. त्याच भागातील समुद्रात विमान कोसळले असल्याचे स्पष्ट झाले आहे.सूरबाया विमानतळावर असलेल्या दुर्दैवी विमानातील १६२ही जणांच्या निकटवर्तीयांनी मृतदेह मिळाल्याच्या वृत्तानंतर आक्रोश केला. तेथील टीव्हीवर त्यांना समुद्रातून जहाजांवर मृतदेह वर काढण्यात येत असल्याचे दृश्य पहावे लागले. एअर एशियाच्या विमानाचे एकूण १० तुकडे शोध पथकांना मिळाले. स्थानिक वेळेनुसार काल सकाळी १०.१५ वा. समुद्रात अवशेष आढळून आले अशी माहिती इंडोनेशियाच्या शोधकार्य मोहिमेचे प्रवक्ते एम. युसुफ यांनी सांगितले.