बेपत्ता बाशुदेवप्रकरणाचा तपास आता गुन्हा अन्वेषण विभागाकडे

0
7

सांत इस्तेव कुंभारजुवा येथील फेरी धक्क्यावरून नदीच्या पात्रात कारगाडी गेल्यानंतर महिना उलटला तरी बेपत्ता बाशुदेव भंडारी (गुजरात) या युवकाचा थांगपत्ता लागू न शकल्याने या बेपत्ता प्रकरणाचे गूढ कायम आहे. राज्य सरकारने या प्रकरणाचे तपासकाम जुने गोवा पोलिसांकडून आता, गोवा पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण विभागाकडे सुपूर्द केले आहे.

महिना उलटला तरी बाशुदेव भंडारी यांच्या बेपत्ता प्रकरणाचे गूढ कायम आहे. जुने गोवा पोलिसांनी या बेपत्ता प्रकरणाचा विविध अंगाने तपास केली. तथापि, अजूनपर्यंत प्रकरणाचा छडा लावण्यात यश आले नाही.

जुने गोवा पोलिसांनी 30 सप्टेंबरला दुसऱ्यांदा नदीच्या पात्रात नौदलाचे पाणबुडे, ड्रोनच्या साहाय्याने शोध मोहीम हाती घेतली. तथापि, बेपत्ता बाशुदेव याचा काहीच थांगपत्ता लागू शकलेला नाही.

बाशुदेवच्या कुटुंबीयांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन या प्रकरणाचा सीबीआयच्या माध्यमातून तपास करण्याची विनंती केली आहे. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी याची दखल घेऊन हे प्रकरण गुन्हा शाखेकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे.