विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रविण तोगडिया पोलिसांच्या अटकेत असताना बेपत्ता झाल्याचा आरोप विहिंपच्या कार्यकर्त्यांनी केल्यावरून त्यांनी सोला पोलीस स्थानकावर गोंधळही घातला. मात्र नंतर रात्री उशिरा तोगडिया अहमदाबादमध्येच एका ठिकाणी बेशुद्धावस्थेत सापडले. त्यांच्यावर तेथील चंद्रमणी इस्पितळात उपचार सुरू आहेत.
याबाबत वृत्त असे, एका जुन्या प्रकरणी राजस्थान पोलिसांचे एक पथक तोगडिया यांना अटक करण्यासाठी काल अहमदाबादमध्ये दाखल झाले होते. तथापि अहमदाबाद पोलिसांच्या गुन्हे विभागाने तोगडिया बेपत्ता असल्याचे सांगून त्यांचा शोध चालू असल्याचे स्पष्ट केले. मात्र भाजपचे प्रवक्ते जय शहा यांनी राजस्थान पोलिसांनी तोगडियांना पकडून नेल्याचे सांगितले.
राजस्थान पोलीस तोगडिया यांना अटक करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गेले होते. मात्र ते घरी नव्हते असे पोलिसांचे म्हणणे होते. मात्र या वृत्तामुळे विहिंप कार्यकर्ते आक्रमक बनले. त्यांनी सोला पोलीस स्थानकात गोंधळ घातला. तोगडिया सोमवारी सकाळी १० वा. पासून बेपत्ता झाले होते.