बेदरकार दुचाकी चालक जागीच ठार

0
118

काल सकाळी पावणे सहाच्या दरम्यान गोवा शिपयार्ड शेजारी नोबर्ट फिटनेस समोर पार्किंग करून ठेवलेल्या चौदा चाकी ट्रेलरच्या पाठीमागे एका दुचाकी वाहन चालकाने जोरदार धडक दिल्याने दुचाकी चालक राजेश मोहन कुमार नायडू (१८) राहणारा ३१ (ब) नोफ्रा, चिखली याला आपले प्राण गमवावे लागले. धडक इतकी जबरदस्त होती डीओ दुचाकी जीए-०६-एच-७८४४ या गाडीचा चेंदामेंदा झाला.दुचाकीस्वाराने मे. जी. एम. भंडारी नामक कंपनीच्या ट्रेलर जीए-०२-वी-९१०८ याच्या पाठीमागे नंबर प्लेटच्या भागाकडे धडक दिल्याने सदर दुचाकीस्वाराचे तोंड त्या भागावर आपटल्याने तेथेच गतप्राण झाला. ट्रेलर गोवा शिपयार्डमध्ये जाण्यासाठी तिथे थांबला होता असे ट्रेलरचा चालक गोरख बिले (३०) याने सांगितले. नंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हॉस्पिसियोत पाठवण्यात आला व नंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. सदर मृत व्यक्ती कर्मा पेट्रोल पंपवरती कामाला होता. तसेच त्याच्याकडे वाहन चालवण्याचा परवाना नव्हता व गाडी दुसर्‍या एका चलवादी नामक व्यक्तीची होती, असे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले.
त्याच्या पाठीमागे त्याची आई व लहान बहीण असा परिवार आहे. आई घरकाम करून उदरनिर्वाह चालवते असे सांगण्यात आले. पीएसआय गौतम साळूंके यांनी पंचनामा करून ट्रेलर व चालक यांना ताब्यात घेतले. अधिक तपास चालू आहे.