राज्यात बिगर गोमंतकीयांसाठी उभारण्यात येणाऱ्या महाकाय निवासी प्रकल्पांना (मेगा प्रॉजेक्ट्स) आता मोठ्या संख्येने विरोध होऊ लागलेला आहे. सांकवाळ व अन्य काही पंचायतींच्या ग्रामसभांपाठोपाठ आता बेताळभाटी पंचायतीच्या काल झालेल्या विशेष ग्रामसभेत मोठ्या निवासी प्रकल्पांना परवाने न देण्याबाबत चर्चा होऊन अशा प्रकल्पांना विरोध करण्यात आला. तसेच ह्या महाप्रकल्पांमुळे पंचायतीतील नैसर्गिक संसाधने व साधनसुविधा यावर कसे अनिष्ट परिणाम होऊ शकतात त्यासंबंधीही चर्चा करण्यात आली.
स्थानिक लोकांच्या गरजा लक्षात घेऊन सरकारने एक नवा प्रादेशिक आराखडा तयार करावा, अशी मागणीही यावेळी ग्रामसभेतून करण्यात आली.
सासष्टीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांनी आपले जे म्हणणे आहे ते सरकारसमोर ठेवावे, असा सल्ला यावेळी बोलताना दिला.