बेकायदा मच्छीमारी विरोधात एका महिन्यात कायदा तयार करा

0
107

>> सर्व संबंधितांच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचा आदेश

राज्यातील किनारी भागातील समुद्रात १२ नाविक मैल अंतरात बेकायदा मच्छीमारी करणार्‍या मोठ्या मच्छीमारी यांत्रिक ट्रॉलरवर कारवाई करण्यासाठी मच्छीमारी खात्याने एका महिन्यात आवश्यक नियम व कायदा तयार करण्याचा आदेश मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल दिला.

बागा-कळंगुट येथील स्थानिक मच्छीमारांनी कर्नाटकातील दोन मच्छीमारी यांत्रिक ट्रॉलर बुधवारी पकडून ठेवले आहेत. बेकायदा मच्छीमारी प्रकरणी पकडण्यात आलेल्या ट्रॉलरवर कारवाईची मागणी स्थानिक मच्छीमारांकडून केली जात आहे. या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी कळंगुटचे आमदार तथा बंदर कप्तान मंत्री मायकल लोबो, सांतआंद्रेचे आमदार फ्रान्सिस सिल्वेरा, मच्छीमारी, बंदर कप्तान खात्याचे अधिकारी आणि किनारी पोलीस अधिकारी यांची संयुक्त बैठक गुरूवारी घेऊन बेकायदा मच्छीमारी करणार्‍यावर कारवाईसाठी संबंधितांना आवश्यक सूचना केल्या आहेत.

१२ नाविक मैलांच्या आत मच्छीमारी करणार्‍या यांत्रिक बोटीवर कारवाईसाठी नियम नसल्याने कारवाईमध्ये अडथळा निर्माण होत असल्याचे बैठकीत स्पष्ट झाले. त्यामुळे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी मच्छीमारी खात्याच्या अधिकार्‍यांना एका महिन्यात बेकायदा मच्छीमारी करणार्‍या कारवाईसाठी नियमावली तयार करण्याचा आदेश दिला आहे.

परराज्यातील यांत्रिक बोटीतून किनारी भागात बेकायदा मच्छीमारी केली जात असल्याच्या तक्रारी येत आहेत.