बेकायदा बांधकामांविरुद्ध वीरेश बोरकर यांचे बेमुदत धरणे आंदोलन

0
4

सांतआंद्रेतील आरजीपीचे आमदार वीरेश बोरकर यांनी बेकायदा बांधकामांच्या मुद्द्यावरून कालपासून पाटो-पणजी येथील नगरनियोजन खात्याच्या मुख्य कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.

बांबोळी येथील डोंगर उतारावर आणि समुद्रकिनाऱ्यावर बेकायदेशीर बांधकामांविरुद्ध त्यांनी हे आंदोलन छेडले आहे.
बांबोळी येथील एका पंचतारांकित हॉटेलने समुद्रकिनारी आणि डोंगर उतारावर केलेल्या बेकायदा बांधकामाच्या विरोधात वीरेश बोरकर यांनी गेल्या काही दिवसांपासून आवाज उठवून नगरनियोजन खात्याकडे तक्रार केली होती; मात्र अजूनपर्यंत नगरनियोजन खात्याने या बेकायदा बांधकामाच्या विरोधात ठोस कारवाई न केल्याने त्यांनी बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. आरजीपीचे प्रमुख मनोज परब हे सुध्दा बेमुदत आंदोलनात सहभागी झाले आहेत.

विरेश बोरकर यांना नगरनियोजन कार्यालयाच्या मुख्य फाटकावर अडविण्यात आले. त्यामुळे त्यांनी मुख्य फाटकाजवळच बेमुदत आंदोलन सुरू केले आहे.
बांबोळी येथील समुद्रकिनाऱ्यावरील बेकायदा बांधकामांबाबत नगरनियोजनमंत्री विश्वजीत राणे गप्प आहेत. नगरनियोजन खात्याच्या अधिकाऱ्याकडून तक्रारीबाबत कोणतीही कार्यवाही केली जात नाही, असे बोरकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

गोवा किनारी विभाग व्यवस्थापन प्राधिकरणाने समुद्रकिनाऱ्यावरील बेकायदा बांधकामे बंदचा आदेश जारी केलेला आहे, असेही बोरकर यांनी निदर्शनास आणून दिले. बांबोळी एका रिसॉर्टने अनेक नियम उल्लंघन करत पर्यावरणाचे नुकसान केले आहे. त्या रिसॉटला दिलेले परवाने तात्काळ रद्द करण्याची मागणी बोरकर यांनी केली आहे.