वाळपईत ईद सणाच्या निमित्ताने गुरांची मोठ्या प्रमाणात कत्तल करून त्यांचे अवयव वेळूस नदीत फेकून दिले होते. त्याअनुसरून वाळपई पोलिसांनी कारवाई करताना काल सकाळी उस्मान खान वाळपई तर सायंकाळी गुरुसाब बेपारी (मोती डोंगर-मडगाव) व महबुबसाब बेपारी (खांडेपार) या तिघांना अटक केली. त्यातील उस्मान खान याला डिचोली न्यायालयाने सात दिवसाचा रिमांड दिला. तर अन्य दोघांना उद्या न्यायालयात हजर केले जाईल. बुधवारी वेळूस नदीतून सुमारे पंचवीस गुरांचे अवयव बाहेर काढण्यात आले होते. ईद सणानिमित्त शेकडो गुरांची बेकायदा कत्तल केल्याचा संशय असून त्यादृष्टीने वाळपई पोलिसांनी तपास जोरात सुरु केला आहे. उस्मान खान याने आपल्या मालकीच्या जीए ०४ टी ४४०२ या रिक्षाने गुरांचे अवयव वेळूस नदीत टाकले. गुरांची कत्तल करण्यात आणखीनही काहीजण गुंतले असल्याचे दिसत असून अजूनही काहीना अटक होऊ शकते. डिचोली उपजिल्हाधिकारी बिजु नाईक, डिचोली पोलीस उपाअधिक्षक गजानन प्रभुदेसाई, वाळपई पोलीस निरिक्षक संजय दळवी, पशुसंवर्धन अधिकारी यांनी काल अचानक रिक्षा मालक व गुरांची कत्तल प्रकरणी प्रमुख आरोपी उस्मान खान यांच्या घरावर धाड घातली. त्यावेळी त्याच्या घराच्या मागील बाजुस तीन खड्यात गुरांचे अवयव गाडून देल्याचे निदर्शनास आले. त्याठिकाणी पाच गुरांचे अवयव मिळाले.
मुख्य आरोपी उस्मान खान याने आपण काही केलेच नाही असे भासवले. सी. सी. टिव्ही कॉमेर्यात एक रिक्षा दिसली होती. त्या रिक्षेला वरून ताडपत्री होती. पण आरोपीने दुसर्याच दिवशी शिक्षावरची ताडपत्री काढली व गाडी धुवुन त्यावर अत्तर मारले. त्यावरून तो पोलिसांच्या ताब्यात अचानक सापडला. गोप्रेमीतर्फे रविवारी निवेदन सत्तरीतील ग्रोप्रेमींतर्फे रविवारी वाळपई पोलीस स्थानकात निवेदन दिले जाणार आहे. ईद सणानिमित्त अनेक गुरांची बेकायदा कत्तल करण्यात आली त्याचा विरोध करण्यात येईल.