बेकायदा ऑनलाइन कॅसिनोप्रकरणी दोनापावल येथे 12 जणांना अटक

0
22

गोवा पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण विभागाने दोनापावल येथील एका रिसॉर्टवर छापा घालून तेथे सुरू असलेल्या बेकायदेशीर ऑनलाइन कॅसिनोप्रकरणी 12 जणांना अटक केली असून 36 हजारांची रोख रक्कम आणि 36 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर रामनान यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई 14 नोव्हेंबरला मध्यरात्री करण्यात आली आहे. दोनापावला येथील एका रिसॉर्टमध्ये बेकायदेशीरपणे ‘चान्सेस’ कॅसिनो चालवला जात असल्याची माहिती गुन्हा शाखेला मिळाली होती. पोलीस पथकाने मंगळवारी मध्यरात्री कॅसिनोवर छापा घातला. यावेळी तेथे दहाजण जुगार खेळत होते. तसेच, तेथे कॅसिनो व्यवस्थापक आणि एक कर्मचारीही होता. या 12 जणांना पथकाने रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले. यावेळी लाईव्ह पत्ते खेळण्याचे 1 टेबल, 6 लॅपटॉप, 1 लाईव्ह कार्ड शफलर, 1 कार्ड स्कॅनर, 2 मॉनिटर, 1 कॅश चिप फ्लोट असे 36 लाखांचे साहित्य आणि 36 हजारांची रोख रक्कम जप्त करण्यात आली.