बेकायदा इंटरनेट केबल्सवर कारवाई होणारच

0
2

>> उच्च न्यायालयाकडून अखिल गोवा इंटरनेट सेवा पुरवठादार संघटनेला दिलासा नाहीच; वीज खात्याकडून कारवाईसाठी हालचाली

वीज खांबांवरील बेकायदा केबल्स प्रकरणात अखिल गोवा इंटरनेट सेवा पुरवठादार संघटनेला दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दुसऱ्यांदा स्पष्ट शब्दांत काल नकार दर्शवला. वीज खांबांवरील इंटरनेट केबल्स न कापण्याचे निर्देश वीज विभागाला द्यावेत, अशी विनंती संघटनेने गोवा खंडपीठाकडे केली होती; मात्र न्यायालयाने या प्रकरणामध्ये अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला असून, या प्रकरणी पुढील सुनावणी 18 मार्चला घेतली जाणार आहे. दरम्यान, वीज खांबांवर केबल्स घालण्यासाठी आवश्यक परवानगी न घेतल्याने आणि निर्धारित शुल्क सुद्धा न भरल्याने कारवाईला सुरुवात केली जाणार आहे, असे वीज खात्याचे कार्यकारी अभियंता काशिनाथ शेट्ये यांनी दिला आहे.

वीज खात्याने वीज खांबांवरील बेकायदा केबल्सच्या विरोधात कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. काही ठिकाणी केबल्स कापण्यात आल्याने इंटरनेट आणि टीव्ही सेवेत बराच व्यत्यय निर्माण झाला होता. या कारवाईनंतर अखिल गोवा इंटरनेट सेवा पुरवठादार संघटनेने गोवा खंडपीठात धाव घेतली. संघटनेने पहिल्यांदा याचिका दाखल केल्यानंतर खंडपीठाने ती फेटाळली होती आणि वीज खात्यास कारवाईस मुभा दिला होती.
केबल टीव्ही आणि इंटरनेट सेवा देण्यासाठी केबल ऑपरेटर्स सर्रास वीज खांबांचा वापर करतात. त्यासाठी वीज खात्याकडून शुल्क निर्धारित करण्यात आले आहे; मात्र अनेक केबल ऑपरेटर्सनी हे शुल्क भरलेलेच नाही. मध्यंतरीच्या काळात वीज खात्याने केबल ऑपरेटर्सना शुल्कासह दंड भरण्यासाठी नोटिसा पाठवल्या होत्या. या नोटिसांना केबल ऑपरेटर्सनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे वीज खाते खांबांवरील केबल तोडण्याची कारवाई सुरू करणार आहे, असे काशिनाथ शेट्ये यांनी सांगितले.

इंटरनेट सेवेवर परिणाम होणार : ब्रिटो
वीज खात्याने केबल कापल्यास राज्यातील केबल टीव्ही आणि इंटरनेट सेवेवर विपरित परिणाम होणार आहे. हा विषय न्यायप्रविष्ट आहे. शुल्क भरण्यासह सर्व अटींचे पालन करण्याची असोसिएशनच्या सदस्यांची तयारी आहे. वीज खात्याने शुल्क भरण्यास अजून थोडा अवधी द्यावा, अशी मागणी अखिल गोवा इंटरनेट सेवा पुरवठादार संघटनेचे अध्यक्ष माविन ब्रिटो यांनी पत्रकारांशी बोलताना काल केली.

2 लाख ग्राहकांना फटका
राज्यात केबल टीव्हीचे दीड लाख ग्राहक आहेत. तसेच केबलद्वारे 50 हजार ग्राहकांना इंटरनेट सेवा पुरविण्यात येते. केबल्स कापल्यास इंटरनेट आणि टीव्ही सेवेवर विपरित परिणाम होण्याची भीती माविन ब्रिटो यांनी काल व्यक्त केली.