
>> आव्हान जिवंत; मुंबईवर १४ धावांनी मात
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने वानखेडेवरील पराभवाची परतफेड करताना मुंबई इंडियन्सवर १४ धावांनी मात करीत इंडियन प्रीमियर लीगच्या ११व्या पर्वातील बाद फेरीच्या आशा जिवंत राखल्या. महत्त्वपूर्ण लढतीत बेंगळुरूने मुंबईला १४ धावांनी पराभूत केले.
पराभवामुळे मुंबई इंडियन्स काहीशी बॅकफूटवर गेली आहे. त्यांना आता बाद फेरीतील प्रवेशासाठी मुंबईला उरलेल्या सर्वच्या सर्व सहाही सामन्यांत पूर्ण गुणांची कमाई करणे अत्यावश्यक ठरले आहे. विजयामुळे बेंगळुरू ८ सामन्यांतून ६ गुणांसह ५व्या स्थानी पोहाचला आहे. तर मुंबई तेवढ्याच लढतींतून ४ गुणांसह ७व्या स्थानी आहे.
बेंगळुरूकडून मिळालेल्या १६८ धावांच्या विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्स संघाला ७ गड्यांच्या मोबदल्यात १५३ धावांपर्यंत मजल मारता आली. हार्दिक पंड्याने ४२ चेंडूत ५ चौकार व १ षट्काराच्या सहाय्याने ५० धावांची अर्धशतकी खेळी करीत संघाच्या विजयासाठी प्रयत्न केला. कृणाल पंड्या व जेपी ड्यूमिनी यांनी प्रत्येकी २३ धावा जोडल्या. परंतु इतर फलंदाजांना मोठी खेळी करण्यात अपयश आल्याने त्यांना १४ धावांनी पराभव स्वीकारावा लागला.
तत्पूर्वी मुंबई इंडियन्सकडून प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रण मिळाल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाने ७ गडी गमावत १६७ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली होती. क्वींटन डी कॉक (७) मिचेल मॅक्लांघनच्या गोलंदाजीवर रोहित शर्माकडे झेल देऊन परतला. लगेच आक्रमक ४५ धावांची खेळे केलेला मनन व्होराही मयंक मारकंडेचा पायचितचा शिकार ठरल्यानंतर ब्रेंडन मॅक्कलम आणि विराट कोहली यांनी संघाचा डाव सावरताना तिसर्या विकेटसाठी ६० धावांची भागीदारी केली. हार्दिक पंड्याने अचूक फेकीवर मॅक्कलमला (३७) धावचित करीत ही जोडली फोडली. त्यानंतर हार्दिक पंड्याने एकाच षट्कांत बेंगळुरूला तीन झटके दिले. त्याने मनदीप सिंग (१४) व विराट (३२) यांना पहिल्या दोन चेंडूंवर तर वॉशिंग्टन सुंदरला (१) शेवटच्या चेंडूवर बाद केले. टीम साऊदी (१) बुहराहला उचलून मारण्याच्या प्रयत्नात रोहितकडे झेल देऊन परतला. बेंगळुरू दीडशेचा आकडा पार करणार नाही असे वाटत असताना शेवटच्या षट्कांत कोलिन डी ग्रँडहोमने मिचेल मॅक्लांघनला २४ धावा कुटत मुंबईसमोर १६८ धावांचे लक्ष्य ठेवले.
धावफलक,
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू ः मनन व्होरा पायचित गो. मयंक मारकंडे ४५, क्वींटन डी कॉक झे. रोहित शर्मा गो. मिचेल मॅक्लांघन ७, ब्रेन्डन मॅक्कलम धावचित (हार्दिक पंड्या) ३७, विराट कोहली झे. कीरॉन पोलार्ड ३२, मनदीप सिंग झे. सूर्यकुमार यादव गो. हार्दिक पंड्या १४, कोलिन डी ग्रँडहोम नाबाद २३, वॉशिंग्टन सुंदर झे. रोहित शर्मा गो. हार्दिक पंड्या १, टीम साऊदी झे. बेन कटिंग गो. जसप्रीत बुमराह १, उमेश यादव नाबाद १. अवांतर ः ६ वा. एकूण २० षट्कांत ७ बाद १६७ धावा. गोलंदाजी ः जीन पॉल ड्युमिनी २/०/२८/०, मिचेल मॅक्लांघन ४/०/३४/१, जसप्रीत बुमराह ४/०/२२/१, कृणाल पंड्या ४/०/२४/०, मयांक मारकंडे ३/०/२८/१, हार्दिक पंड्या ३/०/२८/३.
मुंबई इंडियन्स ः सूर्यकुमार यादव पायचित गो. उमेश यादव ९, ईशान किशन त्रिफळाचित गो. टीम साऊदी ०, जे. पी. ड्यूमिनी धावचित (उमेश यादव) २३, रोहित शर्मा झे. क्वींटन डी कॉक गो. उमेश यादव ०, कीरॉन पोलार्ड झे. क्वींटन डी कॉक गो. मोहम्मद सिराज १३, हार्दिक पंड्या झे. विराट कोहली गो. टीम साऊदी ५०, कृणाल पंड्या झे. मनदीप सिंग गो. मोहम्मद सिराज २३, बेन कटिंग नाबाद १२, मिचेल मॅक्लांघन नाबाद ०. अवांतर ः २३ धावा. गोलंदाजी ः टीम साऊदी ४/०/२५/२, उमेश यादव ४/०/२९/२, मोहम्मद सिराज ४/०/२८/२, युजवेंद्र चहल ४/०/२३/०, वॉशिंग्टन सुंदर १/०/१५/०, कोलिन डी ग्रँडहोम ३/०/२८/०.