बुमराह कसोटी संघात

0
58

>> टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिका दौरा

वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याची भारताच्या कसोटी संघात निवड करण्यात आली आहे. टीम इंडियाच्या कसोटी संघात स्थान मिळण्याची त्याची ही पहिलीच वेळ आहे. बुमराहचा सध्याचा जबरदस्त फॉर्म पाहता द. आफ्रिका दौर्‍यासाठी १७ सदस्यीय कसोटी संघात त्याचा समावेश करण्यात आला आहे. अतिरिक्त यष्टिरक्षकासाठीची जागा पार्थिव पटेलने मिळविली आहे. ५ जानेवारीपासून केपटाऊन कसोटीद्वारे भारताच्या द. आफ्रिका दौर्‍याची सुरूवात होणार आहे.

केपटाऊन, सेंच्युरियन व जोहान्सबर्ग या तिन्ही स्थानांवरील खेळपट्‌ट्या वेगवान गोलंदाजांसाठी पुरक असल्याने रविचंद्रन अश्‍विन व रवींद्र जडेजा या दोनच फिरकीपटूंना स्थान मिळाले आहे. बुमराहने जानेवारी महिन्यात गुजरातकडून झारखंडविरुद्ध रणजी सामना खेळला होता. यानंतर त्याने प्रथमश्रेणी क्रिकेट खेळलेले नाही. यंदाच्या रणजी मोसमात बुमराह एकही प्रथमश्रेणी सामना खेळलेला नसून न्यूझीलंडच्या टी-२० मालिकेनंतर त्याने बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत सराव करणे पसंत केले. आंतरराष्ट्रीय मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये त्याचा फॉर्म भन्नाट असून त्याने यंदा आत्तापर्यंत ३५ वनडे बळी घेतले आहेत.
भारतीय संघ ः विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), मुरली विजय, लोकेश राहुल, शिखर धवन, चेतेश्‍वर पुजारा, रोहित शर्मा, वृध्दिमान साहा, रविचंद्रन अश्‍विन, रवींद्र जडेजा, पार्थिव पटेल, हार्दिक पंड्या, भुवनेश्‍वर कुमार, मोहम्मद शामी, ईशांत शर्मा, उमेश यादव व जसप्रीत बुमराह.