भारताचा प्रमुख जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेला मुकणार आहे. त्याच्या जागी उमेश यादव याची निवड करण्यात आली आहे. पाठीला झालेल्या दुखापतीमुळे बुमराहचे नाव मागे घेण्यात आले आहे. उभय संघांतील मालिका २ ऑक्टोबरपासून विशाखापट्टणम येथे सुरू होणार आहे.
दुसरा सामना पुणे येथे १० ऑक्टोबरपासून तर तिसरा सामना १९ ऑक्टोबरपासून रांची येथे खेळविला जाणार आहे. मागील वर्षी डिसेंबर महिन्यात उमेशने आपला शेवटचा कसोटी सामना खेळला होता. ४१ कसोटींत ३३.४७च्या सरासरीने त्याच्या नावावर ११९ बळींची नोंद आहे. बुमराहने आत्तापर्यंत १२ कसोटी सामने खेळले असून १९.२४च्या सरासरीने ६२ बळी घेतले आहेत. २५ वर्षीय बुमराहने भारताच्या विंडीज दौर्यात हॅट्ट्रिकसह १३ बळी घेतले होते.
भारतीय संघ (सुधारित) ः विराट कोहली, मयंक अगरवाल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, ऋषभ पंत, वृध्दिमान साहा, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, उमेश यादव व शुभमन गिल.