राज्यात चोवीस तासांत नवीन २२१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. कोरोना पॉझिटिव्ह आणखी ७ रुग्णांचे निधन झाले असून कोरोना बळींची संख्या ५९२ झाली आहे.
राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या ४२ हजार ९६८ एवढी झाली असून सध्याच्या रुग्णांची संख्या २४०२ एवढी झाली आहे. राज्यातील कोविड प्रयोगशाळेत नवीन १८०१ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यातील २२१ स्वॅबचे नमुने पॉझिटिव्ह आढळले.
७ जणांचा मृत्यू
राज्यात आणखी ७ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ऑक्टोबर महिन्यातील कोरोना बळींची संख्या १६४ तर, राज्यातील कोरोना बळींची एकूण संख्या ५९२ एवढी झाली आहे. बांबोळी येथील गोमेकॉमध्ये ३, तसेच मडगाव येथे ईएसआय इस्पितळात ३ कोरोना रुग्णांचे निधन झाले आहे. उत्तर गोव्यातील एका खासगी इस्पितळात एका कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
माशेल येथील ७० वर्षीय पुरुष, धारबांदोडा येथील ७० वर्षीय पुरुष, मेरशी येथील ६५ वर्षीय महिला, म्हापसा येथील ७० वर्षीय महिला, वास्को येथील ५६ वर्षीय पुरुष, नावेली येथील ८७ वर्षीय पुरुष व मुंबई येथील ७२ वर्षीय पुरुष रुग्णाचे निधन झाले.
१९६ कोरोनामुक्त
राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह आणखी १९६ रुग्ण बरे झाले असून कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.०३ टक्के एवढे आहे. राज्यात आत्तापर्यंत ३९ हजार ९७४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनाचे सौम्य लक्षण असलेल्या आणखी ११५ जणांनी होम आयसोलेशनचा पर्याय स्वीकारला आहे. इस्पितळात नवीन ५४ रुग्णांना दाखल करण्यात आले आहेत.
पणजीत नवे १५ रुग्ण
पणजी महानगरपालिका परिसरात नवीन १५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण काल आढळून आले असून पणजीतील रुग्णांची सध्याची संख्या १२१ झाली आहे. मिरामार, पाटो प्लाझा, सांतइनेज, करंजाळे, आल्तिनो, दोनापावल आदी भागात नवीन रुग्ण आढळून आले आहेत.
उत्तर गोव्यात पर्वरी येथे सर्वाधिक १४१ कोरोना रुग्ण आहेत. चिंबल येथे १३२ रुग्ण, कांदोळी येथे ११३ रुग्ण, पणजी येथे १२१ रुग्ण आहेत. दक्षिण गोव्यात मडगाव परिसरात सर्वाधिक २२८ कोरोना रुग्ण आहेत. फोंडा येथे १५७ रुग्ण, वास्को येथे ११२ रुग्ण आहेत. इतर भागातील कोरोना रुग्णांची संख्या शंभरांपेक्षा कमी आहे.