बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारताला डबल गोल्ड

0
5

बुडापेस्टमध्ये झालेल्या 45व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारताने खुल्या आणि महिला गटात सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. 2022 साली झालेल्या 44व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारताच्या दोन्ही संघांना कांस्यपदकावर समाधान मानावे लागले होते.

भारताने शेवटच्या फेरीत स्लोवेनियाचा 3.5-0.5 असा पराभव केला. खुल्या विभागात सुवर्णपदक जिंकलेल्या संघात गुकेश डोम्माराजू, रमेशबाबू प्रज्ञानंद, अर्जुन इरिगसी, विदित गुजराथी, पेंटाला हरिकृष्ण आणि श्रीनाथ नारायणन यांचा समावेश आहे. अर्जुन इरिगसी आणि डी गुकेश यांनी स्लोवेनियाविरुद्धच्या शेवटच्या फेरीत आपापल्या सामन्यांमध्ये विजय मिळवल्यानंतर आणि दुसऱ्या स्थानावर असलेल्या चीनला अमेरिकेविरुद्ध दोन गुणांचा फटका बसल्यानंतर भारताचे ऐतिहासिक सुवर्णपदक निश्चित केले. भारताने 11 फेऱ्यांअंती 10 विजय व 1 बरोबरी अशी सनसनाटी कामगिरी करताना 21 गुण
कमावले.

पुरुष संघाच्या ऐतिहासिक विजयानंतर हरिका द्रोणावल्ली, वैशाली रमेशबाबू, दिव्या देशमुख, वंतिका अग्रवाल, तानिया सचदेव यांनी कर्णधार अभिजित कुंटे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला संघाने बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारतासाठी ऐतिहासिक दुहेरी कामगिरी करत सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब केले.
महिला विभागात अंतिम फेरीत भारताने अझरबैजानचा 3.5-0.5 असा पराभव करून सुवर्णपदकाची प्रबळ दावेदारी कायम ठेवली. हरिका, दिव्या आणि वंतिका यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांविरुद्धचे सामने जिंकले, तर वैशालीने बरोबरी साधली. अझरबैजानविरुद्ध विजय मिळवूनही भारताला अव्वल स्थानाची खात्री नव्हती. अमेरिकेने कझाकस्तानविरुद्धची लढत 2-2 अशी बरोबरीत सोडविल्याने भारताचे सुवर्णपदक निश्चित झाले. कझाकस्तानने अमेरिकेविरुद्धचा सामना जिंकला असता तर टायब्रेकरचा वापर करावा लागला असता. भारताने 11 पैकी 9 लढती जिंकत 19 गुणांसह विजेतेपदाला गवसणी घातली.